मुंबई – एंडोक्रिनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बॅरिएट्रिक सर्जन, कार्डिओलॉजिस्ट या तज्ज्ञांनी एकत्र येऊन अभ्यास करत जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (JAPI) मध्ये नुकताच शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधात लठ्ठपणा हा केवळ बीएमआयवर आधारित नवीन लठ्ठपणा मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करण्यात आली आहे.नवीन मार्गदर्शक तत्त्वांची २०२४ मध्ये सर्व वैद्यकीय तज्ञ आणि संघटनांनी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत डाँ.शशांक शाह, प्रख्यात लठ्ठपणा शल्यचिकित्सक आणि डाँ.निता देशपांडे, सह लेखक आणि मधुमेहतज्ञ यांनी व्यक्त केले.
लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो. यासाठी करण्यात आलेल्या सर्नेक्षणात संपूर्ण भारतातील 100,531 प्रौढांच्या डेटाचे मूल्यमापन केले. अलीकडील देशव्यापी क्रॉस-सेक्शनल अभ्यासानुसार, देशातील लठ्ठपणाचे प्रमाण 40.3% इतके आहे, ज्यात महिला, शहरी लोकसंख्या आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. लठ्ठपणाच्या सर्वात जास्त घटना दक्षिण भारतात (46.51%) नोंदल्या गेल्या आहेत तर सर्वात कमी पूर्व भारतात (32.96%) आहेत. 20 ते 69 वर्षे वयोगटातील भारतीय प्रौढांमध्ये 2040 पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वाढत्या लठ्ठपणाच्या दराबरोबरच मधुमेहाचा भार देखील जास्त आहे आणि जागतिक स्तरावर वाढत आहे. याचे मुख्य कारण अस्वास्थ्यकर जीवनशैली आहे. 2019 चा आकडेवारीनुसार भारतात 77 दशलक्ष लोकांना मधुमेह आहे आणि 2045 पर्यंत ही संख्या 134 दशलक्षांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे, यापैकी अंदाजे 57% लोकांचे निदान झालेले नाही.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅरिएट्रिक सर्जन आणि ओबेसिटी अँड मेटाबॉलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया (OSSI), इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन (IEF), आणि ऑल इंडिया असोसिएशन फॉर अॅडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी (AIAARO) चे माजी अध्यक्ष डॉ. शशांक शाह यांनी सांगतात की, आंतरराष्ट्रीय स्तरावर ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे आधीच लागू करण्यात आली आहेत आणि लठ्ठपणावरील उपचार संबंधित समस्यांवर आधारित आहेत. भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते, आणि ते जगातील सर्वाधीक तरुणांची संख्या असलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे. लठ्ठपणा आणि जास्त वजन हे जगभरात महामारीचे कारण ठरत आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. ही स्थिती कर्करोग, टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींसह सर्व चयापचय रोगांची जननी आहे आणि गुडघ्यांचा संधिवात, नैराश्यासारख्या मानसिक विकारांनाही कारणीभूत ठरत आहे.
बॉडी मास इंडेक्स (BMI) हे लठ्ठपणा परिभाषित करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य संज्ञा आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात, एखाद्या व्यक्तीचा बीएमआय 23-25 kg/m2 च्या दरम्यान असतो तेव्हा त्या व्यक्तीचे वजन जास्त आहे असे मानले जाते, तर 25 k/m2 पेक्षा जास्त बीएमआय असलेली व्यक्ती लठ्ठ मानली जाते. तथापि, भारतीय लोकसंख्येला कंबरेभोवती, विशेषत: यकृत आणि स्वादुपिंड यांसारख्या अंतर्गत अवयवांभोवती अतिरिक्त चरबी जमा होण्याची शक्यता असते. मधुमेहासारख्या चयापचयाशी संबंधित रोगांसाठी हे प्रारंभिक कारण ठरु शकते, ज्याला व्हिसेरल लठ्ठपणा किंवा ओटीपोटाचा लठ्ठपणा देखील म्हणतात.
शारीरिक निष्क्रियता आणि वृध्दत्व यांचा भारतातील लठ्ठपणाशी संबंध आहे. स्त्रियांमध्ये ओटीपोटाचा लठ्ठपणा सामान्यत: तिशीनंतर विकसित होतो. दुर्दैवाने, ओटीपोटात लठ्ठपणा आणि चयापचय सिंड्रोम असलेल्या भारतीय लोकसंख्येला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका जास्त असतो, मग त्यांचा बॉडी मास इंडेक्स काहीही असो असेही डॉ. शशांक यांनी स्पष्ट केले.
मधुमेहाचे अनेक रुग्ण असे आहेत की ज्यांचे वजन तुलनेने कमी आहे. फक्त 67 किलो वजन आणि 152 सेमी (5 फूट) उंची, BMI 30 kg/m2 असलेली 45 वर्षीय महिलेचे उदाहरण याठिकाणी मांडण्यात आले आहे. या महिलेला गंभीर मधुमेह, न्यूरोपॅथी, स्लीप एपनिया, तीव्र सांधेदुखी, दोन्ही गुडघ्यांच्या सांध्यातील ऑस्टियोआर्थरायटिस या वेदनांमुळे तिची दैनंदिन कामांवर मर्यादा आली होती. तिला श्वासोच्छवासाचा त्रास होता, ती इन्सुलिनवर जगत होती आणि तिचे तिच्या पतीसोबतचे वैयक्तिक संबंध बिघडल्याने ती भावनिकदृष्ट्या उदासीन झाली होती. तिचे वजन 67Kgs आणि BMI 30 kg/m2 ने याकडे पाहिले तर, सध्याच्या वर्गीकरणानुसार ती गंभीर लठ्ठपणाच्या श्रेणीत येत नाही, परंतु तिला चयापचय, शारीरीक आणि मानसिक समस्या दिसून आल्या. हे अत्यंत गंभीर आहेत म्हणून तिला ग्रेड 3 किंवा गंभीर लठ्ठपणाची रुग्ण म्हटले जाईल आणि कदाचित चयापचय आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेच्या स्वरूपात, आक्रमक उपचारांना ती पात्र ठरु शकते. या महिलेवर शस्त्रक्रिया झाली, मधुमेह दूर झाला, वेदना दूर झाल्या, श्वासोच्छवासाचा त्रास दूर झाला. तिने सामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली, तिची कार्यक्षमता वाढली, मानसिक आत्मविश्वास सुधारला, चयापचय विकार देखील सुधारले. अशा रूग्णांना अधिक योग्य आणि अधिक आक्रमक उपचारांची आवश्यकता असते आणि ही मार्गदर्शक तत्त्वे अशा लोकांना नक्कीच न्याय देतील. ही मार्गदर्शक तत्त्वे अशा व्यक्तींना नक्कीच न्याय देतील असेही डॉ. शशांक यांनी स्पष्ट केले.
आहार आणि व्यायामाने लठ्ठपणावर मात करणे अशक्य झाल्यास बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय ठरतो. 2024 मध्ये या प्रक्रियेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
या व्यक्ती बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील:
– लठ्ठपणाशी संबंधित कोणत्याही कोमॉर्बिडीटीसह किंवा त्याशिवाय 35 kg/m2 पेक्षा जास्त बीएमआय
– लठ्ठपणाशी संबंधित एकापेक्षा जास्त कॉमोरबिडीटीसह 32.5 kg/m2 पेक्षा जास्त बीएमआय
– लठ्ठपणाशी संबंधित दोन पेक्षा जास्त कॉमोरबिडिटीजसह 30 kg/m2 पेक्षा जास्त बीएमआय
– उपचार करुनही अनियंत्रित टाईप 2 मधुमेहासह आणि बीएमआय 27.5 kg/m2 पेक्षा जास्त
– कंबरेचा घेर 80 सेमी पेक्षा जास्त असलेल्या महिला आणि 90 सेमी पेक्षा जास्त असलेले पुरुष, ज्यांना लठ्ठपणाशी संबंधित आजार आहेत.