मुंबई : अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटलने बलाढ्य लीलावती हॉस्पिटलचा १७ धावांनी पराभव करून ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल ए डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिध्देश घरतचे अर्धशतक तसेच प्रतिक घरत व अल्केत तांडेल यांची आक्रमक फलंदाजी केडीए हॉस्पिटल संघाला विजयासाठी फायदेशीर ठरली. सलामीवीर मनोहर पाटेकर, विशाल शिंदे, योगेश जांभळे यांनी छान खेळ करूनही लीलावती हॉस्पिटल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सिध्देश घरत व मनोहर पाटेकर यांना क्रिकेटपटू डॉ. हर्षल वाघ व सत्कारमूर्ती धर्मेश स्वामी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
आंतर हॉस्पिटल ए डिव्हिजनच्या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलने नवरोज-आझाद मैदानावर प्रथम फलंदाजी केली. सिध्देश घरतने (४० चेंडूत ५५ धावा, ७ चौकार) दमदार अर्धशतक फटकविले तर प्रतिक घरत (३० चेंडूत २८ धावा, १ षटकार व १ चौकार) व अल्केत तांडेल (१४ चेंडूत नाबाद २४ धावा, २ चौकार) यांनी जलद धावा केल्या. परिणामी लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटलने ४ बाद १४७ धावांचा पल्ला गाठला. योगेश जांभळेने १७ धावांत २ बळी घेतले.
साखळी सामन्यात नाबाद शतकांसह धडाकेबाज फलंदाजी करणारा रुपेश कोंडाळकरची (८ चेंडूत ९ धावा) विकेट केडीए हॉस्पिटलने लवकर मिळविल्यामुळे प्रारंभी लीलावती हॉस्पिटल संघाला मोठा हादरा बसला. तरीही लीलावती हॉस्पिटलचा डाव सावरण्याचा प्रयत्न सलामीवीर मनोहर पाटेकर ( ३० चेंडूत ३५ धावा, ३ चौकार), विशाल शिंदे (३६ चेंडूत ३१ धावा, १ षटकार व १ चौकार), पराग जाधव (२० चेंडूत २३ धावा, १ चौकार) यांनी केला. परंतु केडीए हॉस्पिटलच्या आनंद सुर्वे (३० धावांत २ बळी), हितेश विघावे (३५ धावांत २ बळी), अष्टपैलू प्रतिक घरत (२८ धावांत १ बळी) आदी गोलंदाजांनी लीलावती हॉस्पिटल संघाला मर्यादित षटकामध्ये ५ बाद १३० धावसंख्येवर रोखले. परिणामी १७ धावांनी शानदार विजय मिळवीत केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघाने अंतिम फेरीमधील प्रवेश निश्चित केला.