राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेकडून देशातील सहा राज्यांतील एकूण १३ संशयितांचे घर तसेच इतर परिसरावर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातदेखील एनआयएने ही कारवाई केली आहे.
एनआयएने देशभरात मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे, बिहारमधील अररिया, कर्नाटक राज्यातील भटकळ आणि तुमकूर, उत्तर प्रदेशातील देवबंद तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण १३ ठिकाणांवर एनआयएने ही कारवाई केली आहे.
एनआयएने युएपीए कायद्याच्या १८, १८ बी, ३८,३९ आणि ४० तसेच भारत दंड संहितेच्या करलन १५३ ए आणि १५३ बी कलमांतर्गत २५ जून २०२२ रोजी दहशतवादी संघटना ISISशी संबंधित एका गुन्ह्याची नोंद केली होती. याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एनआयएने ही कारवाई केली आहे. या कारवाईत संशयित १३ ठिकाणांवरून कागदपत्रे तसेच संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यात एनआयएने छापेमारी केली आहे. कोल्हापूरमधील हुपरी येथून एनआयएने इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शेख या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली.