दिल्ली, 21 जुलै 2022
नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते आज भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 प्रसिद्ध झाला.
यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, वरिष्ठ सल्लागार नीरज सिन्हा आणि इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेसचे अध्यक्ष डॉ अमित कपूर उपस्थित होते.
‘प्रमुख राज्यांच्या’ श्रेणीत कर्नाटकाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ‘ईशान्य आणि डोंगरी प्रदेशातील राज्ये’ या श्रेणीत मणिपूर अग्रणी आहे तर ‘केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ या श्रेणीत चंदीगढ अग्रस्थानी आहे.
‘प्रमुख राज्यांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर तर’ केंद्र शासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ क्रमवारीत गोवा पाचव्या क्रमांकावर आहे.
भारतीय नवोन्मेष निर्देशांकाविषयी
नीती आयोग आणि इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस यांनी संयुक्तपणे तयार केलेला भारतीय नवोन्मेष निर्देशांक देशाच्या नवोन्मेष परीसंस्थेच्या विकासाचे मुल्यांकन करणारे सर्वसमावेशक साधन आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा वाढीला लागावी या उद्देशाने यामध्ये त्यांच्या नवोन्मेष कामगिरीची क्रमवारी निश्चित केली जाते.
जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या चौकटीनुसार देशातील नवोन्मेष विश्लेषणाच्या व्याप्तीवर भारतीय नवोन्मेष निर्देशांकाच्या तिसऱ्या आवृत्तीत भर देण्यात आला आहे. भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2020 मधील 36 वरून भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये निर्देशकांची संख्या 66 पर्यंत वाढली आहे. निर्देशक आता 16 उप-स्तंभांमध्ये विभागले असून यामधून सात प्रमुख स्तंभ बनतात.
भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 हा देशाला नावीन्यपूर्ण अर्थव्यवस्थेत बदलण्याच्या भारत सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचा दाखला आहे.
सुधारणा आणि वृद्धीला चालना देण्यासाठी जागतिक निर्देशांकांद्वारे निवडक जागतिक निर्देशांकाचे परीक्षण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये भारतीय नवोन्मेष निर्देशांक योगदान देतो,ज्यासाठी NITI आयोग ही नोडल संस्था आहे.