मुंबई/NHI/प्रतिनिधी
कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी ६४ शालेय कॅरमपटू ३१ डिसेंबर रोजी झुंजणार आहेत. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-चेंबूर व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने होणाऱ्या कॅरम स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, अविनाश स्पोर्ट्सचे प्रमुख अविनाश नलावडे, नारायण गुरु कॉलेजच्या स्पोर्ट्स डायरेक्टर पूनम मुजावर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत होणार आहे.
श्री नारायण गुरु कॉलेज-चेंबूर पश्चिम येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा आयुष गरुड, वसईच्या ईझाक न्यूटन ग्लोबल स्कूलचा श्रीशान पालवणकर, वांद्र्याच्या महात्मा गांधी विद्यालयाची तनया दळवी, डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे नील म्हात्रे, प्रसाद माने, गौरांग मांजरेकर, देविका जोशी, साई भगत, अक्षद वाघमारे, निधी सावंत, मालाडच्या रयान इंटरनॅशनल स्कूलची जीशा असलडेकर, चेंबूरच्या श्री नारायण गुरु हायस्कूलचे गणपत परीहारीया, मयुरेश कांबळे, महेश जाधव, हर्ष खानसरे, उमेर पठाण, घाटकोपरच्या कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलचा चैतन्य दरेकर, दादरच्या जे.बी वाच्छा हायस्कूलची गौरी सावंत आदी शालेय खेळाडूंमध्ये चुरस राहील. स्पर्धेतील सहभागी उदयोन्मुख खेळाडूंना तज्ञ तसेच क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
******************************