मुंबई : आघाडीवीर मानव दुखुनेलेच्या एकमेव गोलमुळे मुंबई स्ट्रायकर स्पोर्ट्स क्लबने बलाढ्य फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया संघावर १-० असा सनसनाटी विजय मिळवून मुंबई फुटबॉल लीग मधील पुरुषांच्या सुपर डिव्हिजन स्पर्धेचा साखळी सामना जिंकला. पहिल्या गोलसाठी निकराचे प्रयत्न करणाऱ्या मुंबई स्ट्रायकर स्पोर्ट्स क्लबच्या आघाडी फळीने दर्जेदार खेळ केला. फुटबॉल स्कूल ऑफ इंडियाचे जोरदार हल्ले परतविण्यात मुंबई स्ट्रायकरच्या गोलीसह बचाव फळी यांनी वांद्रे येथील नेव्हिल डिसोझा मैदानावर उत्तम कामगिरी पार पाडली. दुसऱ्या सामन्यात बॉम्बे वायएमसीए संघाने कुलाबा फुटबॉल क्लबचा ३-१ असा पराभव करतांना आरिफ अन्सारी (२ गोल) व मोईन खान (१ गोल) यांनी शानदार खेळ केला..
बॉडीलाइन स्पोर्ट्स क्लबने सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना एमएफए मुंबई फुटबॉल लीग अंतर्गत युवा प्रेसिडेंट लीग मुलांच्या गटात बॉडीलाईन स्पोर्ट्स क्लबने एलिट एफएसवर ४-१ असा मोठ्या फरकाने विजय नोंदविला. उत्तरार्धात अरमान शेट्टीने ५२ व्या आणि ६५ व्या मिनिटाला गोल करून बॉडीलाइनच्या विजयात मोठा वाटा उचलला. पूर्वार्धात मिसुम अब्बासने १६ व्या मिनिटाला आणि २६ व्या मिनिटाला इशान रुईयाने गोल करून बॉडीलाईन क्लबला २-० अशी मोठी आघाडी मिळवून दिली. पराभूत एलिट एफएसकडून एकमात्र गोल १९ व्या मिनिटाला यश वाटवानीने लगावला. मिलान एफएने इंडिया रश एससीचा २-० असा पराभव केला. आघाडीवीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम शेख यांनी प्रत्येकी एक गोल केले. दोन गोल लगावणाऱ्या एथन डिसोझाच्या चमकदार कामगिरीमुळे डीएफए वॉरियर्सने सीएफसीआय नाईट्स संघाला २-१ असे हरविले. पराभूत संघातर्फे आरुष वानखेडेने गोल नोंदविला.
******************************