Mumbai : – आंतरराष्ट्रीय मास्टर प्रथम मानांकित विक्रमादित्य कुलकर्णीसह द्वितीय मानांकित अमरदीप बारटक्के, चतुर्थ मानांकित अर्णव खेर्डेकर, पियूष नरसीकर व केविन विजयकुमार यांनी पाचव्या साखळी सामन्या अखेर अपराजित राहून अॅक्युरेट स्प्रिंग्स क्लासिकल फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली. रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे इंडियन चेस स्कूलच्या विद्यमाने सुरू असलेल्या स्पर्धेत नामांकित बुध्दिबळपटूचे दर्जेदार सामने होत आहेत.
पाचव्या साखळी फेरीमधील पहिल्या पटावर विक्रमादित्यने पराभवाच्या छायेत असतानाही महत्त्वाच्या क्षणी घनघोर युध्द करून ओम गाडाच्या राजावर मात केली. क्विन पॉन ओपनिंग पद्धतीने खेळल्या गेलेल्या या डावात ओमने वर्चस्व गाजवले. मात्र ओमच्या निर्णायक क्षणी झालेल्या एका चुकीमुळे विक्रमादित्यला चेकमेट करण्याची संधी वाया दवडली. परिणामी सावरलेल्या अनुभवी विक्रमादित्यने बाजी मारली. दुसर्या पटावर अमरदीपने सिमेट्रिकल क्विन पॉन ओपनिंग पद्धतीच्या डावात सुदीप पिल्लेवर अवघ्या २५ चालीत विजय प्राप्त केला. तिसर्या पटावर पियूष नरसीकरने पांढर्या मोहर्यांसह खेळताना फिलिडोर बचाव पद्धतीच्या डावात यश कापडीच्या राजाला ३७ चालींमध्ये नमविले. ख्रिस इसाई नाझरेथची विजयी घोडदौड अर्णव खेर्डेकरने रोखली. अर्णवने पांढर्या मोहर्यांनिशी खेळताना सिसिलियन बचाव पद्धतीच्या डावात ३३ चालींमध्ये ख्रिसवर मात केली आणि पाचवा गुण वसूल केला.
******************************