बिर्ला मेमोरियल मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत निखिल चारीवर विजय
मुंबई, NHI/ NEWS AGENCY
: फॉर्मात असलेल्या निखिल चारीवर चुरशीच्या लढतीत 17-21, 25-23, 21-15.असा विजय मिळवत यजमान क्लब बॉम्बे जिमखानाच्या राजन सामंतने जी. डी. बिर्ला मेमोरियल मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी 45 वयोगटाच्या विजेतेपदावर नाव कोरले.
बॅडमिंटन 45 आयोजित बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत राजन याच्यासमोर उपांत्य फेरीत अव्वल मानांकित गौतम लाड याला पराभूत करणार्या निखिलचे कडवे आव्हान होते. लोढा बेलिसिमोचे प्रतिनिधित्व करणार्या चारीने विजयी सुरुवात केली. मात्र, सामंतने खेळ उंचावताना पुढील दोन्ही गेम जिंकून दमदार पुनरागमनासह ट्रॉफी उंचावली. दुसर्या गेममध्ये निखिलने कडवी लढत दिली. मात्र, निर्णायक क्षणी राजनने खेळ उंचावत बरोबरी साधली आणि आव्हान कायम राखले. तिसर्या आणि अंतिम गेममध्ये त्याने सातत्य राखताना बाजी मारली.
बॉम्बे जिमखान्याचे प्रतिनिधित्व करणार्या अव्वल मानांकित नाहिद दिवेचा आणि शैलेश डागा जोडीने युनिडबल्सचा एकतर्फी अंतिम सामन्यात त्यांचे क्लब सहकारी अयाज बिलावाला आणि गौरम आश्रा यांना 21-9, 21-9 असे सरळ गेममध्ये हरवले.
टीम इव्हेंटमध्ये राऊंड रॉबिन फेरीमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळाले. त्यात चेंबूर जिमखान्याने एमसीएफ ए टीमला 2-1 असे पराभूत केले. एमआयजीने एफसीए बी टीमचा त्याच फरकाने पराभव केला.
निकाल: पुरुष एकेरी 45 (अंतिम फेरी): राजन सामंत विजयी वि. निखिल चारी 17-21, 25-23, 21-15.
युनिडबल्स (अंतिम फेरी): नाहिद दिवेचा/शैलेश डागा (1) विजयी वि. अयाज बिलावाला/गौतम आश्रा (1) 21-9 21-9.