मुंबई: यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या सन्मानार्थ २४ मेपासून आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी पार्क व क्रॉस मैदानावर ही स्पर्धा १ जूनपर्यंत रंगणार आहे. आयडियल ग्रुप-स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आरएमएमएस सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांसाठी आठ रोख पुरस्कारांसह आकर्षक चषक तसेच वैयक्तिक १२० पुरस्कार दिले जाणार आहेत.
गेली पाच दशके क्रीडा व कामगार क्षेत्रात अव्याहत कार्यरत असलेले राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी उमेदीच्या काळात कबड्डी व व्यायाम प्रकारात उल्लेखनीय खेळ केला होता. तसेच कामगार क्षेत्रातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी यंदाही वाढदिवसानिमित्त आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेचे सातत्य राखले आहे. स्पर्धेप्रसंगी सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. मनोज यादव आणि नानावटी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू प्रतिक पाताडे यांचा विशेष गौरव होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी प्रवेश अर्जासाठी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर (७९७७४ ७१९४३) अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २४ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा.
******************************