मुंबई: सातपुडा इंजिनिअरिंग नाशिक येथील एक प्रतिष्ठित रुग्णवाहिका स्ट्रेचर निर्माण कंपनीच्या “सातपुडा सुपर सेव्हियर” या माहितीपट मालिकाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघात करण्यात आले. कोविड – १९ च्या संकटकाळात अनेक रुग्णवाहिका सेवा प्रदाते आणि रुग्णवाहिका चालक कोरोनायोद्धा म्हणून लढले, त्यांची रुग्णवाहिका ही जीवनवाहिनी ठरली. जिवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्याचे महत्वाचे काम या रुग्णवाहिकांनी केले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात रुग्णवाहिकेचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या अमूल्य योगदानाला प्रोत्साहित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आणि त्यांनी या उपक्रमाला मनापासून पाठिंबा दर्शवला. या कार्यक्रमात सन्मानित रुग्णवाहिका सेवा प्रदाते आणि रुग्णवाहिका चालक यांना “सातपुडा सुपर सेव्हियर” या पदवीने सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सातपुडा इंजिनिअरिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री केदार पाटील यांनी या प्रकल्पामागील प्रेरणेबद्दल आपले विचार मांडले आणि आरोग्य सेवा क्षेत्रांवर त्यांचा संभाव्य परिणाम यावर चर्चा केली. रुग्णवाहिका संकटकाळात सेवेसाठी सदैव तत्पर असते, त्याचं कौतुक करण गरजेचे आहे. श्री केदार पाटील यांनी रुग्णवाहिका चालकांचे वैयक्तिक अनुभव, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले धाडस यावर प्रकाश टाकला. सातपुडा इंजिनिअरिंगचे संचालक सतिश पाटील आणि श्रेयस पाटील यांनी हया उपक्रमाबद्दल त्यांचा दृष्टिकोन व विचार सांगितले. या मालिकेची संपूर्ण संकल्पना, आयोजन आणि दिग्दर्शन तुणीर यांचे असून त्यांच्या टीमने यात मोलाची भूमिका बजावली आहे. श्री तुणीर यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते यांच्या उदात्त कार्याकडे लक्ष वेधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या माहितीपट मालिकांचे महत्व सांगितले. रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदात्याना “सेव्हियर” म्हणजे तारणहार ही उपाधी दिली पाहिजे. जीवन वाचविण्यात आणि समाजासाठी योगदान देण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका मान्य केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सेव्हियर वैभव खेचले आणि सेव्हियर राज लोखंडे यांनी रुग्णवाहिका सेवेबद्दल समाजात आदर नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच सातपुडाच्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोविड-19 महामारीच्या वेळी त्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला त्यावेळी त्यांची भूमिका, समाजसेवेसाठी असलेले समर्पण या सगळ्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हा उपक्रम केवळ त्यांच्या मेहनतीलाच वैध करत नाही तर मनोबल वाढवणाराही आहे. “सातपुडा सुपर सेव्हियर” उपक्रमाचा उद्देश जे आरोग्य सेवेत पडद्यामागे अथकपणे काम करत आहे, त्यांच्या उल्लेखनीय कामांवर प्रकाश टाकून, समाजातील त्यांच्या महत्वाच्या भूमिकेबद्दल जनमानसात प्रशंसा वाढविणे हा आहे. “सातपुडा सुपर सेव्हियर” माहितीपट मालिकांचे सर्व भाग सातपुडा इंजिनिअरिंगच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील.