MUMBAI , NHI NEWS
आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांना शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह व रुपये एकतीस हजार स्वरूपाचा ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रतिष्ठानचे सरचिटणीस विराज मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे क्रीडा उपक्रम तसेच शालेय क्रीडा स्पर्धा विविध संस्थांमार्फत राबविण्यासाठी सेवाभावीपणे कार्यरत असलेले संघटक लीलाधर चव्हाण यांना आंतर शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई पोलीस कबड्डी संघाचे प्रशिक्षक एकनाथ सणस, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, अशोक बोभाटे, नवनाथ दांडेकर, सुनील सकपाळ, राजेश दळवी यांच्यासह शालेय खेळाडू व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयडियल ग्रुपमार्फत चार दशकाहून अधिक काळ ६६ वर्षीय लीलाधर चव्हाण यांच्या पुढाकाराने ९२ बुध्दिबळ स्पर्धा, ३९ कबड्डी स्पर्धा, ८४ क्रिकेट स्पर्धा, ५९ कॅरम स्पर्धा, २२ शरीरसौष्ठव स्पर्धा, २१ व्यायाम स्पर्धा, ७ खोखो स्पर्धा, ४१ विनाशुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबीर आदी क्रीडा उपक्रम मुंबापुरीत यशस्वीपणे साकारले आहेत. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, कोरोना देवदूत पुरस्कार आदी उल्लेखनीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. क्रीडा क्षेत्रातील सेवाभावी तज्ञ मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळे क्रीडा संघटक लीलाधर चव्हाण यांनी गेली अनेक दशके आयडियल शालेय क्रीडा उपक्रमांचे सातत्य कायम राखले आहे. कबड्डी, क्रिकेट, कॅरम, बुध्दिबळ आदी खेळामधील नवोदितांमधून उदयोन्मुख क्रीडापटू घडविण्याचे कार्य जोमाने सुरु राहण्यासाठी पुरस्काराची रक्कम त्यांनी आयडियल ग्रुपला वळती करण्याचा मनोदय व्यक्त केला.