NEWS; NHI; MUMBAI
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरंदरे स्टेडीयममध्ये झालेल्या आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान बँकने रत्नागिरी जिल्हा बँकेचा ६ धावांनी पराभव केला आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. हिंदुस्थान बँकेला जिंकण्यासाठी संतोष मुळीकची अष्टपैलू खेळी (१७ धावा व २ बळी) उपयुक्त ठरली. युगेश सावंतने सर्वाधिक २१ धावांची फलंदाजी करूनही रत्नागिरी जिल्हा बँकेला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पारितोषिक वितरण सोहळा युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, ठाणे युनियन सरचिटणीस प्रदीप पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
निर्णायक सामन्यात रत्नागिरी बँकेविरुध्द प्रथम फलंदाजी करतांना हिंदुस्थान बँकेने अष्टपैलू संतोष मुळीकच्या (१३ चेंडूत १७ धावा) दमदार फलंदाजीमुळे मर्यादित सहा षटकांमध्ये ४८ धावा फटकाविल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना युगेश सावंतच्या १० चेंडूत २१ धावांच्या आक्रमक फलंदाजीमुळे रत्नागिरी बँकेने डावाच्या मध्याला विजयी वाटचाल केली. परंतु निर्णायक क्षणी किशोर गुंजवटे (१२ धावांत ३ बळी), संतोष मुळीक (५ धावांत २ बळी) व मनीष घायगुडे (६ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून रत्नागिरी बँकेला मर्यादित ६ षटकात ९ बाद ४२ धावसंख्येवर थोपविले आणि हिंदुस्थान बँकेला ६ धावांनी शानदार विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत रत्नागिरी जिल्हा बँकेने ठाणे जनता सहकारी बँकेचे आव्हान ९ विकेटने सहज संपुष्टात आणतांना रुपेश जाधवने १९ चेंडूत ४३ धावांची झंझावाती फलंदाजी केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हिंदुस्थान बँकेच्या ७ बाद ५५ धावांचे लक्ष्य गाठताना मात्र वैश्य सहकारी बँकेचा डाव तेवढ्याच धावसंख्येवर गारद झाला. परिणामी सरासरी विकेटच्या बळावर हिंदुस्थान बँकेने अंतिम फेरीत धडक दिली. स्पर्धेमध्ये मनीष घायगुडेने सर्वोत्तम अष्टपैलूचा, रुपेश जाधवने उत्कृष्ट फलंदाजीचा तर विराज वायंगणकरने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकाविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, सहखजिनदार जनार्दन मोरे, अन्य पदाधिकारी भार्गव धारगळकर, अमूल प्रभू, प्रकाश वाघमारे, समीर तुळसकर, अशोक नवले, प्रविण शिंदे, अमरेष ठाकूर, धर्मराज मुंढे, मनोहर दरेकर आदी मंडळी विशेष कार्यरत होती.