BHASKER KORLEKER/NHI :
आत्मचरित्रात बरेचजण स्वतःच्या चुका झाकून चरित्र लिहितात परंतु गोवर्धन भगत यांनी “अष्टपैलू दादा” या आत्मचरित्रात चांगल्या बरोबरच वाईट गोष्टी देखील अत्यंत प्रामाणिकपणे सांगितल्या आहेत, त्यालाच खरंखुरं आत्मचरित्र म्हणतात ,असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक ,विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी “अष्टपैलू दादा “या श्री गोवर्धन भगत यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
“अष्टपैलू दादा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाणेतील गडकरी रंगायतन येथे नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यास डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .ते पुढे म्हणाले, हा एका माणसाचा सोहळा नसून कृष्ण भक्त गोवर्धन नावाच्या एका व्यक्तीचा,दिवा गावातील दिव्याचा प्रकाश महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार आहे. दिव्यासारख्या ग्रामीण भागात परिवर्तनाचा विकासाचा मार्ग दाखवणारे गोवर्धन भगत यांनी राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर दिला.जनतेच्या आणि विवेकाच्या बळावर त्यांनी विविध क्षेत्रात भरीव काम केले. नगरसेवक म्हणून प्रामाणिकपणे सामान्यांची कामे केली.शाळा काढली,चित्रपट निर्मिती केली,नाटकात काम केली, आगरी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले अशा या जनकल्याणकारी समाजसेवकाची समाजाबरोबरच राष्ट्रालाही गरज आहे. भगत यांनी जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाजाची गोरगरिबांची सेवा केली म्हणूनच ते खऱ्या अर्थाने “ दिवाभूषण”ठरले आहेत.त्यांच्या अथक प्रयत्नाने दिवा- आगासन रोड झाला ,या मार्गाला गोवर्धन भगत यांचे नाव देण्याचा लेखक राम माळी यांनी मांडलेला प्रस्ताव यथार्थ असून त्यासाठी येथे उपस्थित सर्वपक्षीयमंडळींनी प्रयत्न करून त्यांच्या कार्याचे स्मरण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी गोवर्धन भगत यांच्या ठाणे पालिकेतील कार्याचा व कारकीर्दीचा तर माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भगत यांच्या सामाजिक राजकीय जीवनाचा आगरी बोलीभाषेतून आढावा घेतला. अष्टपैलू दादा या पुस्तकाचा परिचय व दादांच्या मानपत्राचे वाचन लेखक श्रीकांत चौगुले यांनी केले,यावेळी प्रकाशक व लेखक मिलिंद कसबे, कीर्तनकार ह .भ .प विश्वनाथ महाराज वारिंगे यांचेही भाषण झाले.
“अष्टपैलू दादा “या पुस्तकाचे लेखक, अभिनेते व दिग्दर्शक राम माळी यांनी बोलताना सांगितले की, दादांचा सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील अनुभव व कार्य पाहता दादांना अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभले आहे .या पुस्तकात त्यांच्या जीवनातील गोवर्धन पर्व ,समाज मनातले दादा ,व्यक्तिगत आयुष्य, कला क्षेत्राचा पोशिंदा, शैक्षणिक कार्य, धार्मिक कार्य, लढाऊ दादा व त्यांचे कुटुंबीय अशा आठ पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लिखाणाच्या वेळी दादांना बोलत करणे फार अवघड काम होतं .यात दादांच्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडल्या आहेत. दादांनी आपल्या जीवनात २०टक्के राजकारण व ८०टक्के समाजकारण केले म्हणूनच दादांना” देवमाणूस म्हणून ओळखले जाते. दादांनी माणसे जमवली,सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अनेकांना मदतीचा हात दिला.त्यांच्या हयातीत त्यांच्या प्रयत्नाने साकार झालेला दिवा- अगासन या मार्गाला गोवर्धन चांगू भगत असे नाव द्यावे असे त्यांनी सुचवले.
या कार्यक्रमास दादांच्या पत्नी इंदुमती भगत,माजी आमदार सुभाष भोईर,प्रकाश भोईर, अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे, माजी नगरसेवक देवराम भोईर, सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख, शबनम शेख ,दिवा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय महाजन, दिवा रिक्षा युनियनचे अध्यक्ष विनोद भगत, सामाजिक कार्यकर्ते भोला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शशिकांत खानविलकर यांनी “फणी आणि गाणी “हा कार्यक्रम सादर केला तर दिवा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.