- DCM फडणवीसांची ठाण्यातील विविध दहीहंडींना भेटी; मनसेच्या दहीहंडीला राज ठाकरेंनी लावली हजेरी.
- गो..गो..गोविंदा..कुठं 8 तर कुठं 9 थर; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह
मुंबई : जन्माष्टमीचा सण आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय.
LIVE UPDATE
- ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 13 गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये 9 गोविंदांना कळवा रुग्णालयात तर चार गोविदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये एका महिला गोविंदाचा देखील समावेश आहे.
- मुलुंड येथे आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमाला नृत्यांगना गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिचे नृत्य सुरू असताना युवकांमध्ये गोंधळ उडाला तर यावेळी काही युवकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी गौतमीचा कार्यक्रम काही काळ थांबवण्यात आला. दरम्यान, तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने मागाठाण्यातील तारामती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेली दहीहंडी सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोविंदांशी संवाद साधला. गोविंदा मैदानात उतरले अन् पाऊसच पाऊसच आला. वरूण राज्याचा आशीर्वाद देखील मिळाला आहे. त्यामुळे हंडी फोडा आणि प्रेमाचा काला लोकांपर्यंत पोहोचवावा. सुरक्षित हंडी फोडायची. मनोरा लावायचे आहे.
- ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः हजेरी लावली. यावेळी जय जवान गोविंदा पथकाने दहा थराचा मनोरा उभारण्याचा प्रयत्न केला. अतिशय उत्साहात गो..गो..गोविदांच्या जोशात व गाण्यांच्या तालावर थिरकरणाऱ्या तरुणाईमुळे ठाण्यातील वातावरण दिसून आले. यावेळी मनसेचे माजी आमदार तथा नेते बाळा नांदगांवकर, आमदार राजू पाटीलसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
CM शिंदे यांनी टेंभीनाका दहीहंडीला भेट
धर्मवीर आनंद_दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोविंदांशी सवाद साधला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि अभिनेता वाशु भगनानी हेदेखील खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- ठाणे शहरात दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरे करायची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांनी केली. त्यांच्याच प्रेरणेतून राज्य सरकारने यंदा प्रथमच प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करून दहीहंडीच्या खेळाला प्रतिष्ठा मिळवून दिली. गोविंदा या खेळाला शासकीय खेळाचा दर्जा दिला. राज्यातील १ लाख गोविंदाना १० लाख रुपयांचा विमा काढला, दहीहंडीच्या सणाला शासकीय सुट्टी जाहीर केली तसेच या खेळात जखमी झालेल्या गोविंदाना ५ लाख, गंभीर जखमींना साडे सात लाख आणि मृत्यू झाल्यास १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील महायुती सरकारने विकासकामांचे थर उभे करून एक भक्कम मनोरा रचला आहे. मोदी द्वेषातून कितीही ‘इंडी’ आघाड्या झाल्या तरीही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून २०२४ ची दहीहंडी मोदीच फोडतील असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि हजारो गोविंदा उपस्थित होते.
- भिवंडीत भाजपाकडून कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून यंदा 17 वे वर्ष आहे. तसेच कोरोना काळात लाखो नागरिकांना जेवणाचे वाटप करुन मोलाचे योगदान देणाऱ्या संस्थाच्या हस्ते या दहीहंडीचे उद्घाटन करण्यात आले हे विशेष. भिवंडीच्या दहीहंडीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सिने अभिनेत्री गदर फेम अमिषा पटेल आदी कलाकार यांची उपस्थिती राहणार असून या सोहळ्यासाठी एकूण बक्षीस 25 लाख रुपये ठेवण्यात आले आहे.
- पुण्यातून प्रमोद भानगिरे मित्र मंडळाची दहीहंडीत देखील लोकांची मोठ्या प्रमाणे गर्दी पाहायला मिळाली.
- ठाण्यातील मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला गौतमी पाटील ही गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी आली आहे. तिने गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी डान्सचा जलवाही दाखविला.
- वरळीत आशिष शेलार यांनी परिवर्तन दहीहंडी फोडली. आदित्य ठाकरे यांच्या वरळीत आशिष शेलार यांनी हंडी फोडली. लोकल ट्रेनमध्ये देखील ठाण्याची टेंभी नाक्याची दहीहंडी लाईव्ह दाखवली जात आहे. ठाण्यातील मानाची हंडी आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती.
- मीरा भाईंदर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रवी व्यास यांच्या मॅक्सेस मॅाल जवळच्या दहीहंडी उत्सवात बोरीवलीच्या ओम साई गोविंदा पथकाने आठ थरांची सलामी दिली आहे.
- मागची दहीहंडी आणि दिवाळी चांगली झाली ना? ही देखील दिवाळी आपल्याला चांगली करायची आहे ना म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदासाठी 10 लाख रुपयांचा विमा काढल्याची माहिती दिली आहे.
- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावतीने ठाण्यातील वर्तकनगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात 2012 मध्ये जय जवान गोविंदा पथकाने 9 थर रचून विश्वविक्रम केला होता. गुरुवारी सकाळी ठाण्यात दाखल झालेल्या या गोविंदा पथकाने सर्वप्रथम संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात 9 थर रचण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी या ठिकाणी 9 थरांची यशस्वी सलामी दिली. यावेळी उपस्थितांनी श्वास रोखून धरले होते.
- ठाण्यातील मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेते, फिल्म दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी हजेरी लावली.
- यंदा मुंबईत जवळपास 17 ते 18 हजार दहीहंड्या उभारल्या जाणार असल्याचे चित्र आहे. या दहीहंड्या फोडण्यासाठी केवळ मुंबईत सुमारे 900 गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.
- मुंबई, ठाण्यासह राज्यभरात गोविंदाचा दहीहंडी फोडण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अख्ख राज्य गोविंदामय झालं आहे. पावसासोबत दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात येतो आहे. मागाठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- मुंबईतील दादर परिसरात आयडिलने आयोजित केलेल्या सेलिब्रिटी दहीहंडी मराठी कलाकारांनी मोठ्या उत्साहात फोडली. ज्येष्ठ मराठी अभिनेता विजय पाटकर सह नवोदित कलाकारांनी उत्साहात दहीहंडी साजरी केली.
- साईंच्या शिर्डीमध्ये कृष्णजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.. साईबाबा समाधी मंदिरात गोकुळ अष्टमीनिमित्त कृष्ण जन्म कीर्तन पार पडले.. त्यानंतर 12 वाजता साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा यांच्याहस्ते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला.. कृष्णजन्मोत्सवानिमित्त मंदिरातील चांदीच्या पालखीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती..
- ठाण्यातील मानाची हंडी आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती. टेंभी नाका इथे पहिल्या गोविंदा पथकाचे आगमन झाले आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना त्या पावसाचा आनंद घेत हे पथक ठाण्यात दाखल झालं आहे. मुलुंड येथील साईराज गोविंदा पथकाचे गोविंदा सलामी देण्यासाठी सज्ज आहेत. पाऊस कोसळत असला तरी त्यांच्या उत्साह कुठेही कमी झालेला नसून या मानाच्या हंडीच्या ठिकाणी सलामी देणे हेच आम्ही मानाचं समजतो अशी भावना गोविंदा व्यक्त करत आहेत.
- आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून समाधीवर श्रीकृष्णाचा अवतार रेखाटण्यात आला होता. भाविकांनी जन्माष्टमीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन झाले, तर गोकुळ पूजा विश्वस्त ॲड विकास ढगे यांच्या हस्ते करण्यात आली.
- मुंबईत साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. अंधेरी, रावळपाडा, कन्नमवार नगर, मानखुर्द अशा अनेक दहीहंडीचे मंडप बांधल्यामुळे बेस्टचे मार्ग वळवण्यात आलेत.
- दहिहंडीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार संभाव्य गरज लक्षात घेऊन महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- नागपुरात बडकस चौक मित्र परिवारातर्फे गोकुळाष्टनिमित्त आयोजित दहीहंडी स्पर्धेत आठ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्यासाठी थरांचा थरार सुरु होता. यावेळी गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची ही चुरस पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. सहा थरावर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही काही वेळ उपस्थित होते.
- पुण्यात आज दहीहंडी उत्सव निमित्ताने प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय…शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक संध्याकाळी 5 ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात आली आहे.