नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाव्दारे करण्यात आलेल्या फाँरेन्सिक फायनानशियल आँडीट रिपोर्टमध्ये उघडकीस आला घोटाळा
मुंबई : लिलावती हॉस्पिटलच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच नियुक्ती झाली असून या मंडळाचे नवनियुक्त कायमस्वरूपी विश्वस्त श्री प्रशांत मेहता (लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वांद्रे मुंबईचे कायमस्वरूपी विश्वस्त) यांनी संस्थेत ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले आहे. हा घोटाळा संस्थेने केलेल्या फाँरेन्सिक फायनानशियल आँडीटव्दारे समोर आला असून माजी अनधिकृत मंडळाने केलेला हा या शतकातील सर्वात मोठा वैद्यकीय घोटाळा ठरल्याचे श्री.प्रशांत मेहता यांनी मंगळवारी, ३० एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत उघडकीस आणले.
१८ सप्टेंबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नवनियुक्त मंडळाने कायदेशीर आणि सल्लागार शुल्काचे विस्तृत ऑडिट केले आहे. लेखापरीक्षणातून असे दिसून आले की १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम वकील आणि सल्लागारांवर अवाजवीपणे खर्च करण्यात आली आहे.
लीलावती हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या घोटाळ्याविषयी बोलताना पत्रकार परिषदेदरम्यान श्री.प्रशांत मेहता म्हणाले की, फॉरेन्सिक ऑडिटमध्ये असे आढळून आले की ट्रस्टच्या निधीपैकी २०० कोटी रुपयांचा मंडळाने गैरवापर केला आहे. त्यांनी वैयक्तिक कायदेशीर समस्यांसाठी तसेच त्यांच्या वकील आणि सल्लागारांना पैसे देण्यासाठी या निधीचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे आणि कायदेशीररित्या असा वापर करण्यास परवानगी नाही. माजी उपाध्यक्ष अजय पांडे आणि त्यांचे मुख्य सल्लागार, डाँ.लक्ष्मी नारायणन यांनी कायदेशीर शुल्कासाठी हा निधी वळवल्याचे मान्य केले आणि धर्मादाय आयुक्तांना पुरावे दाखवले. सुशीला मेहता यांचे वकील अँड.अमोल इनामदार यांना मोठी रक्कम देण्यात आली आहे. कोविडच्या महामारीत न्यायालये बंद असतानाही सुमारे १०.७५ कोटी रुपये कायदेशीर खर्च दाखविण्यात आला आहे.
पूर्वीच्या अनधिकृत मंडळाने नव्याने स्थापन केलेल्या मधुलक्ष्मी ट्रस्टला बेकायदेशीरपणे योगदान दिले, जे देणगी दिल्यानंतर एक वर्षापेक्षा कमी कालावधीच दिल्याचे दिसून आले. माजी मंडळाकडून ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आली. ही देणगी विशेषतः विजय मेहता, निकेत मेहता आणि सुशीला मेहता यांच्यातर्फे करण्यात आल्याची माहिती श्री.प्रशांत मेहता यांनी दिली.
श्री.प्रशांत मेहता म्हणाले की, चॅरीटी ट्रस्टच्या निधीचा वापर श्री विजय मेहता आणि श्री निकेत मेहता यांनी चुकीच्या पद्धतीने केला, त्यांनी बनावट कंपन्यांना पैसे दिल्याचे समोर आले यामध्ये एम.एस. वेस्टा आणि एम एस. मेफेअर रिअल्टर्स प्रा. लि. यांना वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याच्या नावाखाली पैसे दिल्याचे दाखविले. या कंपन्या मात्र प्रत्यक्षात आरोग्यसेवेशी संबंधित नसून रिअल इस्टेट विभागात कार्यरत होत्या. १५ कोटींपेक्षा रुपयांपेक्षा जास्त आगाऊ रक्कम देऊनही हॉस्पिटलला अपेक्षित असलेली कोणतीही वैद्यकीय उपकरणे आजवर प्राप्त झालेली नाहीत. निकेत मेहता आणि त्यांचे वडील विजय मेहता यांच्या मास्टरमाईंड योजनेचा उद्देश त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी असून याकरिता ट्रस्टचा निधी खर्च करण्यात आला आहे.
या व्यवहाराबाबत संस्थापकीय विश्वस्त. श्री. किशोर मेहता आणि सौ.चारू मेहता यांनी दाखल केलेल्या तक्रारीला उत्तर देताना श्री निकेत मेहता यांनी खोटा दावा केला की माहीम आणि लोणावळा येथील मालमत्तेचा गैरवापर केल्याने या निधीची भरपाई म्हणून ते वसूल करण्यात आल्याचे सांगितले. मात्र नंतर असे आढळून आले की श्री निकेत मेहता यांनी ही मालमत्ता एकतर्फीपणे स्वतःच्या नफ्यासाठी विकली होती आणि त्यांच्याव्दारे फसवणुक सुरुच होती, असे प्रशांत मेहता यांनी स्पष्ट केले.
मागील अनधिकृत बोर्ड असंख्य फसव्या कारवायांमध्ये गुंतले आहे ज्यांना आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी पकडले आहे तसेच ३०० कोटींपेक्षा जास्त खर्चाची परवानगी नाकारण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, श्री किशोर मेहता आणि श्रीमती चारू मेहता यांना त्यांच्याकडून कोणतीही संभाव्य तक्रार येऊ नये म्हणून याबद्दल त्यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले होते, असेही प्रशांत मेहता यांनी सांगितले.
याशिवाय, बेकायदेशीर ट्रस्टींनी गुजरातमधील पालनपूर येथील ट्रस्टच्या मालमत्तेची तिजोरी फोडून आणि अतिरिक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठी असलेल्या ट्रस्टच्या मालमत्तेची चोरी केली आहे. या चोरीची फौजदारी तक्रार गुजरात न्यायालयात दाखल करण्यात आली असून ती सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. माजी बोर्ड सदस्यांनी विविध व्यवहारांद्वारे हॉस्पिटलची फसवणूक केली आहे, परिणामी ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ही घटना शतकातील सर्वात मोठ्या वैद्यकीय घोटाळ्यांपैकी एक ठरल्याचे प्रशांत मेहता यांनी सांगितले.
प्रशांत मेहता म्हणाले, लीलावती रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही सेवा शिबिर, रोशनी शिबिर आणि मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर ही मोहीम सुरू केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक जण उपचारापासून दूर राहतात. वेळेत उपचार न केल्यास हा आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. त्यामुळे सर्व रुग्णांना कोणत्याही खर्चाशिवाय अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.