भारताच्या प्रत्येक नागरिकाने सरकारवर सातत्याने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे
“विरोधकांनी केलेल्या राजकारणामुळे अतिशय महत्त्वाच्या विधेयकांवर आवश्यक असलेली चर्चा होऊ शकली नाही”
“21 व्या शतकातील हा कालखंड देशातील पुढील हजार वर्षांवर परिणाम करणारा असेल आपण सर्वांनी एकाच उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले पाहिजे”
“आम्ही भारताच्या युवा वर्गाला घोटाळे मुक्त सरकार दिले आहे”
“आज गरिबांच्या हृदयामध्ये आपली स्वप्ने साकार करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे”
“विरोधक अविश्वासाने भरलेले असल्याने त्यांना जनतेचा विश्वास दिसत नाही”
“2028 मध्ये जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल त्यावेळी देश आघाडीच्या तीन देशांमध्ये असेल”
“विरोधकांना त्यांच्या आघाडीचे नाव बदलण्यात रस आहे पण त्यांच्या कार्यसंस्कृतीत ते बदल करू शकत नाहीत”
“स्वातंत्र सैनिक आणि देशाच्या संस्थापकांनी नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला”
“महिलांच्या विरोधातील गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत आणि केंद्र आणि राज्य सरकार दोषींना शासन होईल हे सुनिश्चित करेल”
“मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि ते प्रगतीच्या मार्गावर आगेकूच करेल”
“मी मणिपूरच्या जनतेला ही ग्वाही देतो, मणिपूरच्या माता आणि कन्यांच्या पाठीशी संपूर्ण देश आहे आणि हे सभागृह त्यांच्या पाठिशी आहे”
“मणिपूरला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही”
“आमच्या सरकारने ईशान्येच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे”
“सबका साथ सबका विश्वास ही आमच्यासाठी केवळ एक घोषणा नसून विश्वास आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे”
“संसद हे एका पक्षाचे व्यासपीठ नाही. संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे येथील प्रत्येक सेकंदाचा देशासाठी वापर होतो”
“आजचा भारत दबावासमोर झुकत नाही. आजचा भारत वाकत नाही, थकत नाही आणि थांबत नाही”
NEW DELHI : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला. विरोधकांवरच देशातील जनतेने अविश्वास दाखवला असून त्यांचा अविश्वास प्रस्ताव हा आमच्यासाठी शुभच असतो. एनडीए आणि भाजप 2024 च्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून पुन्हा सत्तेत यावे हे तुम्ही ठरवल्याचे यातून मला दिसत आहे. असे मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, राजकारणासाठी मणिपूरच्या भूमीचा वापर करू नका अशा आवाहनाने मोदींनी आपल्या भाषणाचा शेवट करताना विरोधकांना सोबत येण्याचे आवाहनही केले.
विरोधकांचा अविश्वास हा देवाचा आशीर्वाद
देशातील जनतेने आमच्या सरकारवर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल देशातील कोट्यवधी भारतीयांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. देव खूप दयाळू आहे. देवाची इच्छा असते की ते कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून आपल्या इच्छेची पूर्तता करता. मी हा देवाचा आशीर्वाद मानतो की, देवाने विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची बुद्धी दिली. 2018 मध्येही हा देवाचाच आशीर्वाद होता आणि विरोधक आमच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव घेऊन आहे. तेव्हाही मी म्हणालो होतो की हा आमच्या सरकारचे फ्लोअर टेस्ट नसून विरोधकांची फ्लोअर टेस्ट आहे. आणि झालेही तसेच विरोधकांकडे जितकी मते होती तितकीही त्यांना मिळाली नाही. त्यानंतर जनतेनेही त्यांच्यावर अविश्वास दर्शवला आणि एनडीए आणि भाजपलाही जास्त जागा मिळाल्या. असे मोदी म्हणाले. एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. एनडीए आणि भाजप 2024 च्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून पुन्हा सत्तेत यावे हे तुम्ही ठरवल्याचे मला दिसत आहे असा टोलाही मोदींनी लगावला.
हा जनतेचा विश्वासघात
गेल्या काही दिवसांत दोन्ही सदनांनी अनेक महत्वाची विधेयके मंजूर केली. यात अशी विधेयके होती जी मच्छिमारांच्या हिताची होती. यासाठी केरळच्या सदस्यांकडून चांगल्या सहभागाची अपेक्षा होती, मात्र त्यांच्यावर राजकारणाची नशा चढलेली होती. यातील अनेक विधेयके गरीबांच्या कल्याणाची चर्चा करणारी होती. मात्र यात विरोधकांना काहीही रस नव्हता. देशातील जनतेने त्यांना ज्यासाठी इथे पाठवले आहे, त्या जनतेचा हा विश्वासघात आहे. देशापेक्षा पक्ष मोठा असल्याचे त्यांनी त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आहे. यांना गरीबाच्या भूकेची चिंता नाही, सत्तेची भूक तुम्हाला जास्त आहे. तुम्हाला देशाच्या भविष्याऐवजी स्वतःच्या राजकीय भविष्याची जास्त चिंता आहे अशी टीका मोदींनी केली.
फिल्डिंग विरोधकांची, चौकार-षटकार आमचेच
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची मजा बघा. फिल्डिंग विरोधकांनी लावली, मात्र चौकार-षटकार सत्ताधारी बाजूनेच लागले. ते नो-बॉलवरच चर्चा करत राहिले. सेंच्यूरी इकडूनच होत राहिले. माझे विरोधकांना म्हणणे आहे, थोडी तयारी करून येत जा. 2018 मध्येही मी तुम्हाला म्हणालो होतो. पाच वर्षे तुम्हाला तयारीसाठी दिली. थोडी तयारी करायला हवी. ज्यांचे स्वतःचे वही-खाते बिघडलेले आहे, तेही आमच्याकडे आमचा हिशोब मागत आहेत. या अविश्वास प्रस्तावात काही अशा विचित्र गोष्टी आहेत, ज्या कधी ऐकल्या-बघितल्या नाही.
अधीर रंजन चौधरींना का बोलू दिले नाही?
सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव बोलणाऱ्यांच्या यादीतच नव्हते. 2003 मध्ये अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सोनिया गांधी विरोधी पक्ष नेत्या म्हणून बोलल्या, 2018 मध्ये खरगे जी होते ते बोलले. मात्र यावेळी अधीर रंजन चौधरींना का बोलू दिले नाही हे मला कळत नाही. तुमची मजबुरी काय होती हे मला कळत नाही. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करते. कधी त्यांना निवडणुकीच्या नावाखाली अस्थायी पद्धतीने त्यांचे नेतेपद हटवले जाते. त्यांच्याविषयी आमच्या पूर्ण संवेदना आम्ही व्यक्त करतो अशी कोपरखळी मोदींनी त्यांना मारली.
यांना देशाविषयी चांगले सहन होत नाही
देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न अजूनही काही लोक करतात. मात्र जगाला देशाचे महत्व आज पटले आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या आडून जनतेचा आत्मविश्वास मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशाविषयी काहीही चांगले हे लोक ऐकू शकत नाही. आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा विश्वास देशातील गरीबाच्या मनात निर्माण झाला आहे. देशातील गरीबी सातत्याने कमी होत आहे. साडेतेरा कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. स्वच्छ भारत मोहिमेमुळे 3 लाख लोकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. जे सत्य जगाला दुरून दिसत आहे, ते या लोकांना देशात राहून दिसत नाही. यांच्या रक्तात अविश्वास आणि अहंकार ठासून भरला आहे. त्यांना कधीही जनतेचा विश्वास दिसत नाही. अशा शहामृगी भूमिकेसाठी देश काय करू शकेल?
नजर लागू नये म्हणून काळा टिका
जसा एखाद्या चांगल्या गोष्टीला नजर लागू नये म्हणून काळा टिका लावला जातो, तसाच देशाचा सगळीकडे जो जयजयकार होत असताना, त्यासाठी अविश्वास प्रस्तावाच्या रुपाने काळा टिका लावल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असे मोदी म्हणाले.
यांनी ज्याचे वाईट चिंतले, त्यांचे चांगलेच होते
गेल्या काही दिवसांत विरोधकांनी जमतील तितके अपशब्द वापरले. बरं आहे, इतकं बोलल्याने त्यांच्या मनातील गरळ मोकळी झाली असेल. मोदी तेरी कब्र खुदेगी हा त्यांचा लोकप्रिय नारा आहे. मात्र माझ्यासाठी यांच्या शिव्या, अपशब्द याचेही मी टॉनिक बनवतो. हे असे का करतात? हे का होते याचे गुपित मी सदनात सांगू इच्छितो. हे लोक ज्यांचे वाईट चिंतन करतील त्याचे भलेच होईल असा विरोधकांना एक गुप्त वरदान मिळाल्याचा मला ठाम विश्वास झाला आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण तुमच्यासमोर उभे आहे. गेल्या 20 वर्षांपासून हे इतके वाईट चिंतीत आहेत, पण बघा, भलेच झाले आहे. बँकिंग क्षेत्राचे वाईट होईल असे हे म्हणत होते. या क्षेत्राविषयी अफवा पसरवण्याचे काम यांनी केले. मात्र काय झाले बघा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा दुपटीने वाढला.
आपली संरक्षण हेलिकॉप्टर्स बनवणाऱ्या एचएएलविषयी यांनी किती वाईट शब्द वापरले होते. एचएएल उध्वस्त झाल्याचे हे म्हणाले होते. शेतात जाऊन हल्ली जसे व्हिडिओ शूट होतात. तसेच त्यावेळी एचएएल कारखान्याच्या दरवाज्यावर मजुरांची सभा घेऊन मजुरांना भडकावण्यात आले. एचएएल बुडत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र बघा, आज एचएएल यशाची नवनवी शिखरे गाठत आहे. एचएएलने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदवला आहे. यांच्या मनसोक्त गंभीर आरोपांनंतरही, तिथल्या मजुरांना भडकावण्याच्या अनेक प्रयत्नांनंतरही एचएएल देशाची शान बनून समोर येत आहे.
एलआयसीबद्दल काय काय म्हटले गेले होते. एलआयसी बरबाद झाली आहे, गरीबांचे पैसे बुडत आहे असे म्हटले होते. मात्र आज एलआयसी सातत्याने मजबूत होत आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना माझा सल्ला आहे की, ज्या सरकारी संस्थांना हे लोक नाव ठेवतात, तिथे पैसे गुंतवा. शंभर टक्के फायदा होईल.
ज्यांना हे लोक कोसतात त्यांचे भलेच होते.
या लोकांना देशाचे सामर्थ्य, परिश्रम आणि पराक्रमावर विश्वास नाही. आमच्या सरकारच्या पुढच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे मी म्हणालो होतो. यांना देशाच्या भविष्याविषयी थोडाही विश्वास असता, तर जबाबदार विरोधकांनी प्रश्न विचारला असता की, सांगा हे तुम्ही कसे करणार आहात? आता हेही मलाच शिकवावे लागत आहे. ते काही सल्ला देऊ शकले असते की निवडणुकीत जनेतेसमोर जाऊन ते म्हणाले असते की, हे तिसऱ्याचे सांगत आहे, आम्ही पहिल्या क्रमांकावर नेऊ.
काँग्रेसकडे ना धोरण, ना समज
तिसऱ्या क्रमांकावर जाण्यासाठी काहीच करण्याची गरज नाही असे हे लोक म्हणत आहेत. काँग्रेसनुसार सर्वकाही जर आपोआपच होणार असेल, तर काँग्रेसकडे ना धोरण आहे, ना अर्थव्यवस्थेची समज आहे, ना देशाच्या ताकदीची जाण आहे. यामुळेच काँग्रेस सरकारच्या काळात देशातील गरीबी वाढतच गेली. 2014 नंतर भारताने टॉप-5 मध्ये आपली जागा बनवली. काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल की हे जादूच्या कांडीने होईल. मात्र रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म आणि कठोर मेहनतीने आज देश टप्प्यावर पोहोचला आहे. नियोजन आणि मेहनतीचे हे सातत्य कायम राहिल. यामुळे आपण तिसऱ्या क्रमांवर नक्कीच पोहोचू.
यांच्यात अविश्वास ठासून भरलेला
2028 मध्ये तुम्ही जेव्हा अविश्वास प्रस्ताव घेऊन याल, तेव्हा हा देश पहिल्या तीन क्रमांकात असेल हा देशाचा विश्वास आहे. आमच्या विरोधकांच्या नियतमध्येच अविश्वास आहे. आम्ही स्वच्छ भारताचे आवाहन केले, तेव्हाही यांनी अविश्वास दाखवला. तेव्हा हे म्हणाले की लाल किल्ल्यावरून असे विषय बोलले जातात का. जनधन खात्याविषयी हे असेच बोलले. आम्ही स्टार्टअप इंडियाविषयी बोललो, तेव्हाही हे असेच बोलले. डिजिटल इंडियाबद्दलही हे असेच बोलले. यांच्यातच अविश्वास भरला आहे.
काँग्रेस पक्षाचा इतिहास राहिला आहे, त्यांना कधीही भारत आणि भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. पाकिस्तान देशावर हल्ले करून जायचा आणि म्हणायचा की हे आम्ही केले नाही. यांचे पाकिस्तानवर इतके प्रेम होते की, ते लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. त्यांचा काश्मीरच्या सामान्य लोकांवर विश्वास नव्हता. त्यांचा हुर्रियतवर विश्वास होता. भारताने दहशतवादावर एअर स्ट्राईक केला. यांना देशाच्या सैन्यावर नव्हे, तर शत्रूच्या डावावर विश्वास होता. ही यांची प्रवृत्ती होती.
देशाबद्दल वाईट बोलले त्यावर लगेच विश्वास बसतो
आज कुणीही देशाविषयी अपशब्द वापरले तर यांचा त्याच्यावर लगेच विश्वास बसतो. एखाद्या परदेशी संस्थेने म्हटले की, भूकबळीचा सामना करणारे अनेक देश भारतापेक्षा चांगले करत आहे असे सांगितले की लगेच हे ते मान्य करतात आणि लगेच देशात याचा प्रचार करायला लागतात. यांना देशातील लसीवर विश्वास नाही, परदेशी लसीवर यांचा विश्वास आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांनी देशाच्या लसीवर विश्वास दाखवला. यांना देशाच्या सामर्थ्यावर, देशातील लोकांवर विश्वास नाही. मात्र या देशातील लोकांचाही काँग्रेसविषयी अविश्वासाची भावना खूप खोल आहे हे मी सदनाला सांगू शकतो. काँग्रेस आपल्या अहंकाराने इतकी फुलली आहे की त्यांना जमीनच दिसत नाही.
जनतेत काँग्रेसविषयी अविश्वास
देशातील लोकांचाही काँग्रेसविषयी अविश्वासाची भावना खूप खोल आहे हे मी सदनाला सांगू शकतो. काँग्रेस आपल्या अहंकाराने इतकी फुलली आहे की त्यांना जमीनच दिसत नाही. देशाच्या अनेक भागात विजयी होण्यासाठी काँग्रेसला अनेक दशके झाली आहेत. तमिळनाडूत काँग्रेस 1962 मध्ये अखेरची विजयी झाली होती. तेव्हापासून काँग्रेसवर येथील लोकांचा अविश्वास आहे. पश्चिम बंगालमध्ये 1972 मध्ये काँग्रेस शेवटची विजयी झाली होती. यूपीत काँग्रेस 1985 मध्ये अखेरची विजयी झाली होती. येथील लोक तेव्हापासून काँग्रेस नो कॉन्फिडन्स असे म्हणत आहे. त्रिपुरा आणि ओडिशातही काँग्रेसला अनेक दशकांपासून विजय मिळाल नाही. ओडिशातील जनता 28 वर्षांपासून काँग्रेस नो कॉन्फिडन्स म्हणत आहे. नागालँडमध्ये 1988 मध्ये काँग्रेस अखेरची विजयी झाली होती. दिल्ली, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये तर एकही आमदार नाही. देशातील जनतेने तर अनेकदा काँग्रेसवर अविश्वास व्यक्त केला आहे.
बंगळुरूत युपीएचा अंत्यसंस्कार केला
काही दिवसांपूर्वीच तुम्ही बंगळुरूत युपीएचा अंत्यसंस्कार केला आहे. मी यावर संवेदना व्यक्त करायला हवी होती. मात्र यात उशीर करण्यात माझा दोष नव्हता. एकिकडे तुम्ही अंत्यसंस्कार करत होते, तर दुसरीकडे भग्नावशेषांवर नवे प्लास्टर लावण्याचा आनंदही साजरा करत होते. तुम्ही ज्याच्या मागे जात आहात, त्यांना या देशाची भाषा, इथल्या संस्कृतीची समज नाही. पिढ्यान् पिढ्यापासून यांना हिरवी मिरची आणि लाल मिरचीतील फरक माहिती नाही. मात्र तुम्हाला देशाविषयी माहिती आहे. ज्यांना केवळ नावाचा आधार आहे, त्यांच्याविषयी म्हटले गेले आहे. दूर युद्ध से भागते, नाम रखा रणधीर, भाग्यचंद की आज तक सोई है तकदीर. यांची स्थिती अशी आहे की स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी यांना एनडीएचाच आधार घ्यावा लागला आहे. मात्र सवयीनुसार अहंकाराचा आय यांना सोडत नाही. म्हणून त्यांनी एनडीएत दोन आय जोडले. पहिला आय- सव्वीस पक्षांचा अहंकार, आणि दुसरा आय- एका पक्षाचा अहंकार. एनडीएही चोरला आणि इंडियाचेही तुकडे केले. आय डॉट, एन डॉट, डी डॉट, आय डॉट, ए डॉट. युपीएला वाटते की देशाच्या नावाचा वापर करून आपली विश्वसनीयता वाढवता येईल. मात्र काँग्रेसचे सहकारी आणि काँग्रेसचे अतुट साथी तमिळनाडू सरकारमधील एका मंत्र्याने दोन दिवसांपूर्वीच म्हटले आहे की त्यांच्यासाठी इंडियाचे काहीच महत्व नाही. त्यांच्यासाठी तमिळनाडू या देशाचा भागच नाही. तमिळनाडू ही प्रखर देशभक्तांची भूमी राहिली आहे. तुमच्यातच जर अशी फुट असेल तर तुमची गाडी कुठे जाऊन थांबेल याचा जरा विचार करा.
काँग्रेसने नावापासून, चिन्हापर्यंत सर्वकाही चोरले
नावाबद्दलचा यांचा हा चष्मा आजचा नाही. हा दशके जुना चष्मा आहे. यांना वाटते की नाव बदलून देशावर राज्य करता येईल. गरीबांना चारही बाजूंनी यांचे नाव तर दिसते, मात्र यांचे काम कुठेही दिसत नाही. रुग्णालयांना नाव यांचे, उपचार नाही. शिक्षण संस्था, रस्ते, उद्यान, गरीब कल्याण योजनांना यांचे नाव. विमानतळांना यांचे नाव. योजनांना यांचे नाव आणि त्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार. काँग्रेसच्या ओळखीशी संबंधित कोणतीही गोष्ट त्यांची स्वतःची नाही. निवडणूक चिन्हापासून ते सर्वकाही ज्यावर काँग्रेस दावा करते ते सर्व दुसऱ्याकडून घेतले आहे. आपल्या उणीवा झाकण्यासाठी निवडणूक चिन्ह आणि विचारही चोरले. तरीही जे बदल झाले, त्यात पक्षाचा अहंकारच दिसतो. पक्षाचे संस्थापक परदेशी आहेत. 1920 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक ध्वज मिळाला, तेव्हा काँग्रेसने रातोरात हा ध्वज चोरला. मतदारांना भुलवण्यासाठी गांधी नावही चोरले. काँग्रेसची निवडणुक चिन्हे बघा, दोन बैल, गाय-वासरू आणि नंतर हात. सर्वकाही एका कुटुंबाच्या हातात केंद्रीत झाले आहे. ही इंडिया आघाडी नाही. घमंडिया आघाडी आहे. यांच्या वरातीत प्रत्येकाला नवरदेव व्हायचे आहे. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे. या आघाडीने हाही विचार केला नाही की, कोणत्या राज्यात तुम्ही कोणासोबत आहात.
गेल्या वर्षी केरळच्या वायनाडमध्ये ज्या लोकांनी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केली, त्यांच्यासोबत यांनी मैत्री केली आहे. बाहेरून आपले लेबल बदलू शकतात, मात्र जुन्या पापांचे काय कराल. हे पाप जनतेपासून कसे लपवाल? अभी हालात ऐसे है इसलिए हाथों में हाथ, जहाँ हालात बदले, फिर छुरियाँ निकलेंगी. ही घमंडिया आघाडी घराणेशाहीच्या राजकारणाची सर्वात मोठे प्रतिक आहे.
काँग्रेसला दरबारवाद आवडतो
काँग्रेसला घराणेशाही, दरबारवाद आवडतो. जिथे त्यांची मुले मोठ्या पदावर असावी, जे घराणेशाहीच्या बाहेरील आहेत, ते दरबारी नसतील तर त्यांना संधी मिळणार नाही अशी यांची मानसिकता आहे. दरबारवादामुळे देशाच्या महान लोकांचे अधिकार या लोकांनी दाबले. जे दरबारी नव्हते, त्यांचे पोर्ट्रेटही संसदेत लावण्यास यांची हरकत असायची. गैर-काँग्रेसी सरकार आल्यावर या नेत्यांचे पोर्ट्रेट संसदेत लागले.
म्हणून 400 चे 40 झाले
लंका हनुमानाने नव्हे तर, त्याच्या अहंकाराने जाळली हे अगदी खरे आहे. जनता जनार्दन भगवान रामाचे रुप आहे, म्हणूनच 400 चे 40 झाले.
एकेकाळी यांच्या वाढदिवसाला विमानात केक कापले जायचे. आज त्या विमानात गरीबासाठी लस जाते. हा फरक आहे. एकेकाळी ड्रायक्लिनिंगसाठी कपडे विमानाने यायचे, आज हवाई चप्पलवाला गरीब विमानातून जात आहे. एकेकाळी सुटी घालवण्यासाठी नौदलाच्या युद्धनौका मागवल्या जायच्या. आज नौदलाचे तेच जहाज दूर देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वापरले जातात. जे लोक आचार, व्यवहार, चाल चरीत्राने राजा बनले असतील, आधुनिक राजाच्या मानसिकतेने जे काम करतात, त्यांना गरीबाचा मुलगा इथे बसल्याने त्रास होणारच.
यांच्या दिमागची अवस्था देशाला माहिती
काल इथे दिल से बात करण्याची भाषा बोलली गेली, त्यांच्या दिमागची अवस्था देशाला अनेक वर्षांपासून माहिती आहे. मात्र त्यांचे चरीत्रही काल देशाने बघितले. यांच्या डोक्यात नेहमी मोदीद्वेष असतो. डुबनेवाले को तिनके का सहाराही बहूत. दिल बहल जाए फकत इतना की साराही बहूत. कितने पर भी आसमाँ, आसमाँ वाला गिरा दें बिजलीयाँ, कोई बतला दे जराँ ये डुबता फिर क्या करें.
वारंवार एकच फेल प्रॉडक्ट लाँच करत आहेत
मला काँग्रेसची अडचण माहिती आहे. अनेक वर्षांपासून एकच फेल प्रॉडक्ट वारंवार लाँच करत आहेत. यांचे लाँचिंग फेल होते, आणि हे देशातील जनतेशी द्वेष करतात. मात्र पीआरवाले मोहब्बत की दुकानचा प्रचार करतात. मात्र ही लूट की दुकान झूठ का बाजार आहे. जे कधी जमीनीवर उतरलेच नाही, ज्यांनी नेहमी गाडीची काच खाली करून लोकांची गरीबी पाहिली त्यांना हे पाहून आश्चर्चच वाटेल. जे लोक देशाच्या या स्थितीचे वर्णन करतात, ते हे विसरतात की देशावर 50 वर्षे यांच्याच पूर्वजांचे राज्य होते. ते जेव्हा याचे वर्णन करतात तेव्हा ते यांच्या पूर्वजांच्या अपयशाचे वर्णन करतात.
यांना माहिती आहे की, यांच्या नव्या दुकानवरही लवकरच कुलूप लागणार आहे. या घमंडिया आघाडीच्या आर्थिक धोरणांविषयी मी देशातील जनेला सतर्क करू इच्छितो. निवडणूक जिंकण्यासाठी काहीबाही आश्वासने देऊन जनतेवर याचे ओझे टाकले जात आहे. या घमंडिया आघाडीची आर्थिक धोरणे देशाला दिवाळखोरीत लोटण्याची खात्री आहे. यांची धोरणे अस्थिरता, भ्रष्टाचार, धोरण लकवा, तुष्टीकरण, घराणेशाही, बेरोजगारीची, दहशतवादाची खात्री आहे. हे कधीही देशाला टॉप-3 अर्थव्यवस्था बनवण्याची खात्री देऊ शकत नाही. ही खात्री मोदी देऊ शकतो. देशाला विकसित बनवण्याचा विचारही हे करू शकत नाही, त्या दिशेने काहीही करू शकत नाही.
ऐकण्याचे धैर्य नसते ते पळून जातात
लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नसतो, त्यांना ऐकवण्याचे धैर्य असते, मात्र ऐकण्याचे धैर्य नसते. अपशब्द बोला, पळून जा, कचरा फेका पळून जा अशी ज्यांची वृत्ती असते त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. पोटात दुखत होते आणि डोके फुटत होते याचा हा परिणाम आहे.
मणिपूरबद्दल गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे
मणिपूरच्या विषयावर गृहमंत्र्यांनी कालच विस्तृतपणे सर्व मुद्दे मांडून सरकारची चिंता व्यक्त केली. मात्र राजकारणाशिवाय काहीही करायचे नाही म्हणून यांनी हे खेळ केले. काल अमितभाईंनी विस्तृतपणे यावर सांगितले आहे. मणिपूरवर न्यायालयाचा निर्णय आला आणि यानंतर हिंसा सुरू झाली. याचा अनेक कुटुंबांना त्रास झाला. महिलांविषयी गंभीर गुन्हे झाले. हे गुन्हे अक्षम्य आहेत. दोषींना कठोर शिक्षा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार भरपूर प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमुळे इथे शांततेचा सूर्य नक्की उगवेल असा विश्वास मी देऊ इच्छितो. मणिपूरच्या लोकांना मी सांगू इच्छितो की, देश तुमच्यासोबत आहे. आम्ही सर्व मिळून या आव्हानावर तोडगा शोधू आणि तिथे शांतता प्रस्थापित होईल. मणिपूर पुन्हा विकासाच्या मार्गावर पुढे जाईल यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही.
भारत मातेविषयी जे बोलले ते वाईट
सदनात भारत मातेविषयी जे म्हटले गेले, ते अतिशय खेदजनक आहे. काही लोक भारत मातेच्या मृत्यूची इच्छा का व्यक्त करत आहे हे ऐकून वाईट वाटले. हे ते लोक आहेत, जे कधी लोकशाही तर कधी घटनेच्या हत्येची विधाने करतात. या लोकांच्या मनात जे आहे तेच त्यांच्या जिभेवर येते. तुष्टीकरणाच्या राजकाणाने या लोकांनी भारत मातेचेच नव्हे तर वंदे मातरम गीताचेही तुकडे केले. भारत तेरे टुकडे होंगे या गँगला प्रोत्साहन देण्यासाठी हे लोक पोहोचतात.
काँग्रेसला विचारा कच्छ तिवू काय आहे
कच्छ-तिवू काय आहे हे जरा यांना विचारा. कच्छ-तिवू कुठे आहे हे जरा यांना विचारा. श्रीलंकेच्या आधी येणारे हे बेट तेव्हा कुणी दुसऱ्या देशाला दिले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वात हे झाले होते. भारत मातेला छिन्नविछिन्न करण्याचा इतिहास काँग्रेसचा राहिला आहे.
5 मार्च 1966 रोजी काँग्रेसने मिझोराममध्ये असहाय नागरिकांवर वायुदलाकडून हल्ला केला होता. मिझोरामचे नागरिक या देशाचे नागरिक नव्हते का. मिझोराममध्ये आजही 5 मार्च रोजी शोक व्यक्त केला जातो. हे सत्य काँग्रेसने देशापासून लपवले. आपल्याच देशातील नागरिकांवर वायुदलाने हल्ला केला जातो. तेव्हा कोण होते, इंदिरा गांधी. अकाल तख्तवर हल्ला करण्यात आला.
1962 मधील ते भीतीदायक रेडिओ संबोधन आजही देशाला शूल बनून टोचते. 1962 मध्ये चीनच्या हल्ल्यादरम्यान पंडित नेहरू रेडियोवर म्हणाले होते की, माय हार्ट गोज टू द पीपल ऑफ आसाम. हे संबोधन आजही आसामच्या लोकांना टोचते. नेहरूंनी त्या लोकांना त्यांच्याच स्थितीवर सोडून दिले होते.
लोहियांची आठवण करून दिली
जे लोक स्वतःला लोहियांचे वारस म्हणतात आणि जे काल सदनात मोठ्याने सांगत होते. लोहियांनी नेहरूंवर गंभीर आरोप लावले होते. नेहरू जाणीवपूर्वक ईशान्येचा विकास करत नाही असा आरोप लोहियांनी केला होता. हा किती मोठा हलगर्जीपणा आहे असे लोहिला म्हणाले होते. 30 हजार चौरस मैल क्षेत्र कोल्ड स्टोरेजमध्ये बंद करून त्यांना विकासापासून वंचित ठेवले जात असल्याचे लोहिया म्हणाले होते.
काँग्रेसचे प्रत्येक काम, राजकारण, सरकार आणि निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. यांचा प्रयत्न असायचा की जिथे एक-दोन जागा असायच्या तिथे त्यांचे लक्ष नसायचे. त्यांच्याविषयी यांना काहीही देणेघेणे नसायचे. ईशान्येविषयी यांची वर्तणूक नेहमी सावत्रपणाची असायची. मात्र आमच्यासाठी ईशान्य म्हणजे काळजाचा तुकडा आहे.
ईशान्येच्या समस्यांची जननी ही काँग्रेसच आहे. तिथल्या समस्यांसाठी तिथली जनता नव्हे तर काँग्रेसचे राजकारण जबाबदार आहे. यांची वेदना, संवेदना सिलेक्टिव्ह आहे. हे राजकारण सोडून दुसरा कशाचाही विचार करू शकत नाही. मणिपूरमधील सरकार 6 वर्षांपासून सातत्याने तिथल्या समस्यांवर काम करत आहे.
विरोधकांचे कौतुक, त्यांनी माझे ऐकले
मी विरोधकांचे कौतुक करु इच्छितो, मी 2018 मध्ये त्यांना काम दिले होते, 2023 मध्ये तुम्ही माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव घेऊन या. त्यांनी माझे ऐकले. मात्र त्यांनी थोडे निराश केले. इतक्या वर्षांत थोडी तयारी करून यायला हवे होते. असो. मी 2028 मध्ये त्यांनी अविश्वास प्रस्ताव घेऊन येण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र पुढच्या वेळी थोडी तयारी करून यावी अशी माझी अपेक्षा आहे.
राजकारणासाठी मणिपूरचा वापर करू नका
राजकारणाच्या खेळासाठी मणिपूरच्या भूमीचा गैरवापर करू नका, सोबत येऊन आव्हानांवर मात करू असे आवाहन मोदींनी भाषणाच्या शेवटी सर्व सदस्यांना केले.