MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या १५ वर्षाखालील मुलामुलींच्या विविध ६ वयोगटातील विजेतेपदाचा बीओबी कप पटकाविण्यासाठी आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह १०४ खेळाडूंमध्ये आरएमएमएस, परेल, मुंबई-१२ येथे चुरस राहील. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग, आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने होणाऱ्या बुध्दिबळ स्पर्धेत सिध्दांत खेतान, दर्श राऊत, अर्जुन सिंग, कर्णव रस्तोगी, जश शाह, अथर्व कदम, सार्थक प्रसाद, वारी गोगरी आदी खेळाडू विजेतेपदाच्या दावेदारीसाठी लढतील.
बीओबी कप बुध्दिबळ स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार असून प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची असेल. बँक ऑफ बडोदाच्या सौजन्याने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ९० पुरस्कार तसेच प्रत्येक वयोगटातील सर्वोत्तम बुध्दिबळपटूला रोख रुपये तीन हजार असे एकूण ६ रोख पुरस्कार दिले जातील. प्रत्येक गटांमधील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना बीओबी कपचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बँक ऑफ बडोदा मुंबई विभागाचे असिस्टंट जनरल मॅनेजर-सीआरएम श्री. घन श्याम दास, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष श्री. गोविंदराव मोहिते, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी श्री. राजाबाबू गजेंगी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थीतीत होईल.