दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर शेवटपर्यंत रंगलेल्या साखळी सामन्यात कोपरखैरणे टायटन्सने सानपाडा स्कॉर्पियन्सचा १० धावांनी पराभव केला आणि माझगाव क्रिकेट क्लब आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेच्या पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दुसऱ्या साखळी सामन्यात पहिल्या विजयाची नोंद केली. आदित्य पवार, अरुण यादव यांची फलंदाजी आणि सर्व गोलंदाजांची प्रभावी कामगिरीमुळे कोपरखैरणे टायटन्सचा विजय सुकर झाला. ४५ धावांत ७ फलंदाज माघारी परतले असतांना देखील सानपाडा संघाच्या तळाच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना विजयासाठी झुंजण्यास शेवटपर्यंत भाग पाडले. ऑफ ब्रेक गोलंदाज सर्फराज इम्तियाझ शेखला सामनावीर पुरस्काराने एमसीएचे माजी सदस्य नवीन शेट्टी यांनी गौरविले. दुसऱ्या सामन्यात सामनावीर तनुश कोटियन व श्रीराज घरत यांच्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकी फलंदाजीमुळे ठाणे टायगर्सने मीरा भाईंदर लायन्सवर ४४ धावांनी विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करतांना कोपरखैरणे टायटन्सचे खाते उघडण्यापूर्वीच सलामी जोडी धावबादद्वारे चौथ्या चेंडूवर फुटली. तरीही न डगमगता आदित्य पवार (३२ चेंडूत ४७ धावा, ४ षटकार व ३ चौकार) व अरुण यादव ( ३३ चेंडूत ३५ धावा, १ षटकार व १ चौकार) यांनी सानपाडा संघाविरुद्ध मर्यादित २० षटकामध्ये कोपरखैरणे संघाला आव्हानात्मक ८ बाद ११७ धावसंख्या उभारून दिली. फिरकी गोलंदाज आशितोष माळी (१७ धावांत २ बळी) व रोषण जाधव (१६ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली.
आवाक्यात विजयी लक्ष्य असतानाही सानपाडा संघाची फलंदाजी ७ बाद ४५ धावा अशी ढेपाळली. तळाचे फलंदाज सोनू जैस्वार (१९ चेंडूत २३ धावा, १ षटकार व २ चौकार), तुषार चाटे (६ चेंडूत १४ धावा, २ षटकार) व बद्रे आलम (१३ चेंडूत २० धावा, १ षटकार व २ चौकार) यांना अधिक वेळ खेळपट्टीवर टिकू न देण्यात मध्यमगती गोलंदाज कुणाल नवरंगे (१४ धावांत २ बळी), फिरकी गोलंदाज सर्फराज इम्तियाझ शेख (२० धावांत २ बळी) व सैफ शेख (१८ धावांत २ बळी) यशस्वी ठरले. परिणामी सानपाडा संघाला १८.१ षटकामध्ये १०७ धावसंख्येवर गुंडाळत कोपरखैरणे टायटन्सने चुरशीचा १० धावांनी पहिला विजय संपादन केला. दुसऱ्या सामन्यात मीरा भाईंदरचा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणने (१५ धावांत ३ बळी) ठाणे टायगर्सची अवस्था ३ बाद २४ धावा अशी नाजूक करूनही श्रीराज घरत (४४ चेंडूत नाबाद ६३ धावा, २ षटकार व ५ चौकार) व तनुश कोटियन (५६ चेंडूत नाबाद ७७ धावा, २ षटकार व ८ चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी ९८ चेंडूत १४३ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे ठाणे टायगर्सने रचलेले ३ बाद १६७ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्ध्यांना पेलवले नाही. अष्टपैलू तनुश कोटियन (१७ धावांत ३ बळी) याच्यासह प्रमुख पाच गोलंदाजांनी विकेट घेणारी अचूक गोलंदाजी करून मीरा भाईंदर लायन्सचा डाव १८.१ षटकामध्ये १२३ धावांवर संपुष्टात आणला आणि ठाणे टायगर्सने ४४ धावांच्या फरकाने पहिला साखळी विजय नोंदविला.