अर्थसंकल्पीय अधिवेशन:देशद्रोही, जेलमध्ये टाकणार, पवारांचा एकेरी उल्लेख, कांदा ते कसब्याचा बांधा; विधानसभेत
सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडाखेबंद बॅटींग केली. तर विरोधकांकडून स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड ते भास्कर जाधव यांनी सरकारला कोंडीत पकडले. जाणून घेऊन दिवसभरातल्या अधिवेशनातल्या ठळक घडामोडी.
. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आमदार राम सातपुते उल्लेख एकेरी केला. यावरुन विधानसभेत आज गदारोळ झाला. यावर माफी मागण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यानंतर मी रेकार्ड तपासतो असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. त्यानंतर लगेचच आशिष शेलार यांनी जबाबदारी घेत दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली, त्यानंतर राम सातपुते यांनीही दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे हा गदारोळ संपुष्टात आला..
– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदबरोबर संबंध आहेत. त्यामुळे मलिक हे देशद्रोही आहेत. देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणे हा गुन्हा असेल तर असा गुन्हा मी पन्नासवेळा करेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात ठणकावून सांगितले. यावर नवाब मलिक यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले नाहीत, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. विरोधी पक्षातील नेत्यांना महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही असे म्हटल्याबद्दल विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत विरोधक आहेत. यावर आज विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला.
– मला एका महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप आज विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. आमदार भास्कर जाधव आज विधानसभेत म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विधानसभेत कठोर शब्दांत टीका केली होती. त्यानंतर लगेच माझ्याकडे चौकशी अधिकारी पाठवण्यात आले. मला एका महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मी तुरुंगात जायला तयार आहे. मात्र, या प्रकरणात माझ्या मुलाचेही नाव गोवण्यात आले आहे.
– राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ नये यासाठी नाफेडच्या माध्यमातून प्रत्यक्षात बाजार समितीत कांदा खरेदी करण्यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली. शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत निर्णय विचाराधीन असून, लवकरच या निर्णयाची घोषणा केली जाईल याबाबत सभागृहासमोर प्रत्यक्ष निवेदन करण्यात येईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
– के. जे. सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थी डहाणू येथे शिबिरास गेले असताना शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अर्धनग्नकरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली. त्यावर दोन दिवसात सविस्तर अहवाल सभागृहात सादर केला जाईल अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
– कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले असून, त्यांना विधानसभेत बसण्याची जागा द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. तेव्हा त्यांना राहुल नार्वेकरांनी चिमटा काढलाच, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही कुठे दिसतच नाही, असा टोला हाणला. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मते घेत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. हा निकाल येताच विधानसभेत नाना पटोले यांनी आनंद व्यक्त केला. त्यावरून खडाजंगी रंगली.
– अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या आणि यातील एक जरी जागा महाविकास आघाडीकडे आली तर हा भाजपला धक्का असेल..
काल काय घडले?
– वाढती महागाई, वीजप्रश्नांनवर बुधवारी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले. हे प्रश्न सोडवा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली होती. मात्र, नंतर संपूर्ण दिवस संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानेच गाजला. सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूलाच राहिले.
– संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर खासदार संजय राऊत यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. आज हक्कभंग प्रस्तावावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.
– विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचे विधानभवनात तीव्र पडसाद उमटले.
– संजय राऊत यांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसही आक्रमक झालेले पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, निषेध केला नाही तर हजारो राऊत विधीमंडळाचा अपमान करतील. आम्ही चोर असलो तर उद्धव ठाकरेही याच विधीमंडळाचे सदस्य आहेत. ते ही चोर ठरतील असे वक्तव्य विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.