अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात रविवारी सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे. त्यात अनेकजण ठार झाल्याची भीती आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, चिनी नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री 3.30च्या सुमारास शेकडो नागरिक मोंटेरी पार्क भागात जमले होते. तिथे ही घटना घडली.
वर्णद्वेषातून घडली घडल्याचा दावा
स्थानिक माध्यमांनी या घटनेत जवळपास 10 जण ठार, तर 19 जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही. काही सोशल मीडिया अकाउंट्सवर ही घटना वर्णद्वेषातून घडल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक व आशियाई कम्युनिटीच्या नागरिकांत हा हिंसाचार झाला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृतांत एक महिला व तिच्या 6 महिन्याच्या मुलाचाही समावेश आहे. याशिवाय 17 वर्षांचा एक चिनी वंशाचा तरुणही यात मारला गेला आहे. पोलिस लवकरच या घटनेविषयी अधिकृत निवेदन जारी करणार आहेत.
गाण्याच्या तीव्र आवाजाने गोळीबाराचा आवाज ऐकण्यास आला नाही
‘स्काय न्यूज’ने स्थानिक प्रशासनाचा दाखला देत म्हटले आहे की, गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्यामुळे काहीवेळापर्यंत हा गोळीबार झाल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. अनेकांना ही आतषबाजी असल्याचे वाटले. पण नंतर जखमी जीवाच्या आकांताने पळत असल्याचे पाहून वस्तुस्थिती लक्षात आली.
कार्यक्रमाला होती हजारोंची गर्दी
पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी हजारोंची गर्दी होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. येथे गत 2 दिवसांपासून हा फेस्टिव्हल सुरू होता. विशेष म्हणजे या भागात यापूर्वीही स्थानिक श्वेतवर्णीय व आशियाई समुदायातील नागरिकांत हिंसाचाराच्या घटना घडल्यात. गतवर्षी अशाच एका घटनेत 5 जणांचा बळी गेला होता.
मध्यरात्री अचानक गोळीबार
मीडिया रिपोर्ट्सनुसार – मृतांचा आकडा झपाट्याने वाढू शकतो. कारण, संगीताच्या आवाजात जखमींचा आवाज दबल्या गेल्यामुळे त्यांना बराच वेळ उपचार मिळू शकले नाहीत. याशिवाय घटनास्थळी 10 हजार जणांची गर्दी होती. त्यामुळे रुग्णवाहिकेला तेथे पोहोचण्यास मोठा विलंब झाला.
लॉस एंजेलिसपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरील एक उपनगरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी चिनी जोडप्याच्या घरात घुसूनही गोळीबार केला. पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. या घराचे फुटेजही समोर आले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले- हल्लेखोरांचे शत्रुत्व तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांशी नव्हते, तर एका चिनी जोडप्याशी होते. त्यामुळेच अनेक जण मारले गेले.
काही लोकांनी या घटनेचा अंमली पदार्थांच्या तस्करीचाही संबंध असल्याचा दावा केला आहे. या परिसरात जवळपास 3 हजार लोक राहतात. त्यात बहुतांश चिनी नागरिकांचा समावेस आहे. कोरोनानंतर अमेरिका व युरोपातील चिनी नागरिकांवरील हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे.