मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी नानावटी हॉस्पिटल विरुद्ध जसलोक हॉस्पिटल यामध्ये १९ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानात फायनल होईल. रहेजा हॉस्पिटल विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामध्ये तृतीय क्रमांकाची लढत होईल.
सलामीवीर ओंकार जाधव, दिनेश पवार यांच्यासह दहाव्या विकेटपर्यंत नानावटी हॉस्पिटलची फलंदाजी भक्कम असून अष्टपैलू प्रतिक पाताडे, फरहान काझी, विजय बागडे, नितीन रांजे, संदीप गुरव, विशाल चतुर्वेदी यांची गोलंदाजीदेखील स्पर्धेत प्रभावी ठरली आहे. जसलोक हॉस्पिटलचे सलामीवीर श्रीकांत दुधवडकर, नितीन सोळंकी, प्रवीण मोरजकर, दीपक रत्नापुरकर, सचिन दुधवडकर, प्रसाद पाटील, रोहित जाधव, सचिन तोडणकर, अनिकेत कुटे यांची कामगिरी बलाढ्य संघांना नामोहरण करणारी ठरत आहे. परिणामी क्रिकेट शौकिनांना चुरशीचा अंतिम सामना पाहण्यास सोमवारी मिळणार आहे.
रहेजा हॉस्पिटलचे सचिंद्र ठाकूर, विजय वैती, दीपक काळे, चेतन सुर्वे, अविनाश डांगळे, भक्तराज पावसकर, संतोष पाटील विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डॉ. हर्षद जाधव, रोहित सोमार्डे, सुशांत गुरव, डॉ. इब्राहीम शेख, विशाल सावंत, मारीओ फर्नांडीस, सुरज घोलप यांच्या कामगिरीवर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ठरेल. महत्वाचा नाणेफेकीचा कौल ओम्नीचे डायरेक्टर ओमकार मालडीकर, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत दिला जाईल.