मुंबई, 15 डिसेंबर 2022: शिवनेरतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व यशस्विनी योजना सहकार्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विनाशुल्क शालेय सुपर लीग कबड्डीच्या मुख्य फेरीत चेंबूरच्या अफॅक इंग्लिश स्कूलने प्रवेश केला. अष्टपैलू अहमद शेखला युवराज सुर्वेने दिलेल्या उत्तम साथीमुळे अफॅक हायस्कूलने बलाढ्य श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलचा १५ गुणांनी पराभव करून चौथ्या पूर्व विभागीय टप्प्याचे प्रथम स्थान पटकाविले. अहमद शेख व इशांत पालव यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन मुख्याध्यापिका अश्विनी प्रधान, मुख्याध्यापिका अनिता केणी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
अष्टपैलू अहमद शेखच्या गुणासह खोलवर चढाया रोखण्यात अडवाणी स्कूलचे क्षेत्ररक्षक अयशस्वी ठरले तर अफॅक स्कूलचे बचावपटू युवराज सुर्वे, अजलीश यादव आदींचे भक्कम क्षेत्ररक्षण भेदण्यात अडवाणी स्कूलचे चढाईपटू इशांत पालव, संचित धोपट, यश सावंत यांना उत्तरार्धात अपयश आले. परिणामी अफॅक स्कूलने अखेर ४६-३१ अशी बाजी मारली. शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेमधील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स लढतीसाठी अँटोनिओ डिसोझा हायस्कूल-भायखळा, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, सरस्वती विद्या मंदिर-भटवाडी, अफॅक इंग्लिश स्कूल-चेंबूर असे विभागवार चार विजेते शालेय संघ पात्र ठरले आहेत. त्यांच्यामध्ये साखळी सामने २१ व २२ डिसेंबर रोजी होणार असून शालेय खेळाडूंना तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभण्यासाठी शिवनेर संघटन समितीचे अध्यक्ष खा. सुनील तटकरे व कार्याध्यक्ष नरेंद्र वाबळे विशेष प्रयत्नशील आहेत.