अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा व ताराबाई मोडक हायस्कूल-दादर शालेय संघांनी शिवनेरतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व यशस्विनी संस्थेच्या सहकार्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रशिक्षणासह विनाशुल्क शिवनेर ट्रॉफी शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेच्या निर्णायक फेरीमध्ये दक्षिण विभागात डिसोझा हायस्कूलने सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव संघाचा २५ गुणांनी तर मध्य विभागात मोडक हायस्कूलने मुक्तांगण हायस्कूल-ना.म. जोशी मार्ग संघाचा २७ गुणांनी पराभव केला. चढाईपटू हर्ष शेरकर, रोहित जेधे, सुजन धीरज, संस्कार भोसले यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डिसोझा हायस्कूलने हर्ष शेरकर व सुजन दळवी यांच्या चौफेर खेळामुळे कदुरी हायस्कूल संघाविरुध्द पहिल्या डावात ३४-१४ अशी आघाडी घेत उत्तरार्धात देखील जोरदार मुसंडी मारली. कदुरी हायस्कूलच्या रोहित जेधेला उशिरा सूर सापडल्यामुळे डिसोझा हायस्कूलने ५३-२८ असा मोठा विजय संपादन केला. उदयोन्मुख सबज्युनियर कबड्डीपटू सुजन धीरज व श्लोक पारेख यांच्या दमदार खेळामुळे ताराबाई मोडक हायस्कूलने मुक्तांगण हायस्कूलचा ५०-२३ असा पराभव करून मध्य विभागाची निर्णायक लढत जिंकली. पराभूत संघाच्या संस्कार भोसलेने छान खेळ केला. क्रीडाप्रेमी नरेंद्र वाबळे, गोविंदराव मोहिते, ओमकार मालडीकर व लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंतर शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेचा प्रशिक्षणासह मोफत उपक्रम मुंबईतील विविध विभागात २२ डिसेंबरपर्यंत रंगणार आहे. शालेय खेळाडूंना नामवंत राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांच्यासह एनआयएस कबड्डी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, एकनाथ सणस, अविनाश महाडिक, सुनील खोपकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.