मुंबई ; शिवनेरतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व यशस्विनी सहकार्याने सुरु झालेल्या विनाशुल्क शालेय सुपर लीग कबड्डीच्या विभागीय प्राथमिक फेरीत अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा, सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव संघांनी विजयी आगेकूच केली. डिसोझा हायस्कूलने सीताराम प्रकाश हायस्कूलचा १७ गुणांनी तर कदुरी हायस्कूलने ज्ञानेश्वर विद्यालयाचा ३२ गुणांनी पराभव केला. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू सक्षम सूर्यवंशी, प्रवीण द्विवेदी, साईराज तांबे, अनुराग जुवाटकर आदी सबज्युनियर कबड्डीपटूना पुरस्काराद्वारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, एनआयएस कबड्डी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, प्रशांत अडारकर, सुनील वाघे, प्रमोद बागवे आदी मंडळींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
माझगाव येथील स्व. एकनाथभाई बांदल मैदानातील डिसोझा हायस्कूल विरुद्ध सीताराम प्रकाश हायस्कूल यामधील चुरशीची लढत मध्यंतराला ३२-२७ अशा गुणांनी थांबली. उत्तरार्धात सक्षम सूर्यवंशी व प्रणेय बागडे यांनी दमदार खेळ करून डिसोझा हायस्कूल संघाला ५१-३४ असा मोठा विजय मिळवून दिला. पराभूत संघाच्या प्रवीण द्विवेदीने छान खेळ केला. दुसऱ्या सामन्यात सर एली कदुरी हायस्कूलने ज्ञानेश्वर विद्यालय विरुद्ध पहिल्या डावात २८-१२ अशी आघाडी घेत विजयी चाहूल दिली. चढाईपटू साईराज तांबे व अभिषेक शेजवळ यांनी दुसऱ्या डावात देखील आक्रमक खेळ करीत कदुरी हायस्कूलच्या विजयावर ५४-२२ असा शिक्कामोर्तब केला. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या अनुराग जुवाटकरने उत्तम चढाया केल्या. क्रीडाप्रेमी नरेंद्र वाबळे, गोविंदराव मोहिते, ओमकार मालडीकर व लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासह आंतर शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेचा मोफत उपक्रम मुंबईतील विविध विभागात २२ डिसेंबरपर्यंत रंगणार आहेत.