ठाकरेंच्या सभेला तुफान प्रतिसाद; बुलडाणा जिल्ह्यातील तिन्ही नेते खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर आणि आमदार संजय गायकवाड यांच्या पोटात गोळा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्या चिखलीत सभा घेतली, तिथले आमदार-खासदार त्यांना सोडून गेले होते, पण ठाकरेंना त्याचा काडीमात्र फरक पडला नाही. उलट अधिक त्वेषाने ते भाजप शिंदे गटावर तुटून पडले. एकनाथ शिंदे यांचं भविष्य, भावना गवळींची राखी आणि देवेंद्र फडणवीस यांची लाज काढत उद्धव ठाकरेंनी घणाघाती भाषण केलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं तर शिवसेना फुटीवरुन बंडखोर आमदार-खासदारांना इशारेही दिले.
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. मेहकरचे आमदार संजय रायमुलकरांनी शिंदे गटात प्रवेश केला तर बुलडाणा शहरचे आमदार संजय गायकवाड आणि सिंदखेडराजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनीही एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याचा दोन महिन्यांपूर्वी निर्णय घेतला. त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन ठाकरेंनी सभा घेतली. आमदार खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरेंच्या सभेला प्रतिसाद कसा मिळतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं असताना ठाकरेंना एवढा मोठा आणि जबरदस्त प्रतिसाद मिळाला की शिंदे गटात गेलेल्या नेत्यांसाठी हे सारं अनपेक्षित होतं.
बुलडाणा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि त्याचबरोबर प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांचा सुध्दा बालेकिल्ला बनला. जिल्ह्यातील तिन्ही नेते शिंदे गटात गेल्याने सेनेचा गड ढासळल्याची चर्चा होती असं असलं तरी ठाकरेंच्या सभेत कुठेच तसं चित्र जाणवलं नाही. आमदार-खासदार शिंदेंसोबत पण निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंसोबत असल्याचं चित्र दिसले हे ठाकरेंच्या सभेला हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीने हेच चित्र अधोरेखित केले.
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना शिवसेनेने भरुनभरुन दिलं. त्यांना तीन वेळा खासदार केलं. कुठल्याही अडअडचणीच्या काळात ठाकरे कुटुंब जाधवांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलं, पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि जाधवांनी पुढचा मागचा विचार न करता शिंदेंना साथ द्यायचा निर्णय घेतला. तत्पूर्वी आमदार संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांनीही ठाकरेंवर आरोप करत त्यांची साथ सोडली आणि शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी गुवाहाटी गाठली. गेले ते गद्दार, राहिलेले निष्ठावंत; गद्दारांना गाडूया, पुन्हा नव्या सैनिकाला निवडून देऊन मशाली पेटवूया, अशी ठाकरेंनी घोषणा दिली त्याला सभेतील प्रचंड जनसमुदायाने उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
आमदार खासदार नसतानाही, ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली. शिवसेनेच्या बुलढाण्यातील त्रिदेवांनी ठाकरेंची साथ सोडल्यावर बुलढाण्याची सभा कशी होणार? मंचावर कोण असणार? शिवसैनिकांची उपस्थिती असणार का? असे प्रश्न होते.. पण ठाकरेंनी या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हजारो शिवसैनिकांची उपस्थितीच सगळं काही सांगून गेली. आमदार खासदार नसतानाही, ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मुंबईबाहेरची पहिलीच सभा उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात घेतल्यामुळे खासदार जाधव, आमदार संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड यांच्यापुढील अडचणी नक्कीच वाढल्या आहेत, अशी जिल्ह्यात चर्चा आहे.