मुंबई : कप्तान नरेश शिवतरकरच्या कल्पक नेतृत्वास अष्टपैलू सुभाष शिवगण, अभिजित मोरे, राकेश शेलार व रोहन म्हापणकर यांनी यशस्वी साथ दिल्यामुळे जे.जे. हॉस्पिटल संघाने बलाढ्य हिरानंदानी हॉस्पिटलचा ८ विकेटने मोठा पराभव केला आणि ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल ए डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अष्टपैलू प्रतिक अंभोरे व तुषार राणे यांनी हिरानंदानी हॉस्पिटलचा डाव सावण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले. अष्टपैलू सुभाष शिवगण व प्रतिक अंभोरे यांना स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन ज्येष्ठ क्रीडा पत्रकार नवनाथ दांडेकर, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले. जे.जे. हॉस्पिटलची अंतिम लढत केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघाविरुद्ध २९ नोव्हेंबर रोजी नवरोज खेळपट्टीवर होणार आहे.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित आंतर हॉस्पिटल ए डिव्हीजन उपांत्य सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून हिरानंदानी हॉस्पिटलने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांना अनुकूल ठरला नाही. मध्यमगती गोलंदाज रोहन म्हापणकर (१३ धावांत ३ बळी), फिरकी गोलंदाज राकेश शेलार (९ धावांत ३ बळी), मध्यमगती गोलंदाज सुभाष शिवगण (१८ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे हिरानंदानी हॉस्पिटलचे आघाडी फळीतील पाच फलंदाज अवघ्या १६ धावसंख्येवर तंबूत परतले. तरीही तुषार राणे (३२ चेंडूत ३१ धावा, २ चौकार) व प्रतिक अंभोरे (३५ चेंडूत ३५ धावा, ३ चौकार) यांनी हिरानंदानी हॉस्पिटल संघाला १७.२ षटकात सर्वबाद ८२ धावांचा पल्ला गाठून दिला.
विजयी लक्ष्य आटोक्यात राहिल्यामुळे सलामीवीर सुभाष शिवगण (३२ चेंडूत नाबाद ३८ धावा, ६ चौकार), अभिजित मोरे (२५ चेंडूत २२ धावा, २ चौकार) व राकेश शेलार (९ चेंडूत नाबाद १७ धावा, १ षटकार व २ चौकार) यांनी विजयी पथाकडे नेणारी आक्रमक फलंदाजी केली. परिणामी जे.जे. हॉस्पिटलने १३ व्या षटकाला २ बाद ८५ धावा फटकावून अंतिम फेरी गाठली.