-
मुंबई – राजकारणात प्रत्येकाची भुमिका वेगवेगळी असू शकते. निर्णायक पध्दतीने विचार करण्याची वेळ येते तेव्हा मुल्य या देशाने जपले आहे. मात्र सर्वांगिण राजकारणाकडे सर्वस्पर्धी पध्दतीने, तटस्थपणे पाहण्याची तसेच इतर वैचारिक भुमिकाही समजून घेण्याची गरज आहे. प्रगल्भ लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार टिकायला हवा, अशी ठाम भुमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली. त्यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, विश्वस्त देवदास मटाले, वैजयंती आपटे-कुलकर्णी, राही भिडे उपस्थित होते.
खा. ोतटकरे पुढे म्हणाले की, सद्याच्या परिस्थितीत राजकारणी व्यक्तींना मोकळेपणाने बोलता येत नाही, त्याची अनेक कारणे आहेत. काही बोललो तर त्याचीच ब्रेकींग न्यूज होईल याची भिती असते. मात्र राजकारणी व्यक्ती कोणत्याही पक्षात असो त्याने इतर वैचारिक भुमिका समजून घेणे गरजेचे असते. सद्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून बोलताना दबक्या आवाजात बोलले जाते. आज निर्माण झालेली परिस्थती त्यावरही बोलणे अवघड झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळातील आचार्य अत्रे यांच्या विचारांचा अंगार कमी झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी राजकारणाला लांडग्याची उपमा दिली आहे. लांडग्याचा चेहरा मोहक, असे रुपक त्यांनी वापरत सद्याच्या राजकारणाचा समाचार घेतला. सासणे यांनी मांडलेल्या या रोखठोक भुमिकेचे खासदार तटकरे यांनी समर्थन केले. आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी प्रकाश कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.
राजकारणाचा लांगड्याचा चेहरा आहे. लांडग्याचा चेहरा मोहक असू शकतो. भवतीचा आवाज वाढला आहे. त्यात सत्याचा आवाज ऐकला जात नाही. साक्ष ऐकली जात नाही, अशी खंत साहित्य समंलनाचे अध्यक्ष सासणे यांनी व्यक्त केली. त्यामुळे सत्य सांगणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सत्य हे सर्वत्र उपलब्ध आहे. त्याला भिंगातून पाहण्याची गरज नाही. विवेकाचा, सत्याचा उद्घाेष झाला पाहिजे. तो करताना कुणी भयभीत होवू नये. असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आचार्य अत्रे यांच्या निर्भीड,परखड आणि लोकाभिमूख पत्रकारितेचा मुक्तकंठाने गौरव केला. पत्रकार सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच पत्रकार संघाच्या पत्रकारिता प्रशिक्षणार्थींचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कार्यवाह संदिप चव्हाण यांनी केले तर आभार संयुक्त कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी मानले. सुत्रसंचालन शैलेंद्र शिर्के यांनी केले.