आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित क्रीडाप्रेमी स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक १४ वर्षाखालील आंतर शालेय सांघिक मोफत बुध्दिबळ स्पर्धेमध्ये आरएसटी सेकंडरी स्कूल-गोवंडी संघाने अंतिम विजेतेपद पटकाविले. आरएसटी स्कूलने चुरशीच्या अंतिम सामन्यात अंधेरी येथील समता विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल-साकीनाका संघाचा २-१ असा पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. परिणामी समता विद्यामंदिरला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चेंबूरच्या अफॅक इंग्लिश स्कूलने दादरच्या ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे आव्हान ३-० असे संपुष्टात आणून तृतीय क्रमांक पटकाविला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सेक्रेटरी किशोर रहाटे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आरएसटी स्कूल विरुद्ध समता विद्यामंदिर संघातील अंतिम सामना अटीतटीमध्ये रंगला. डावाच्या मध्यापर्यंत समता विद्यामंदिरच्या खेळाडूंनी तिन्ही पटावर वर्चस्व राखले होते. परंतु निर्णायक क्षणी आक्रमक डावपेच रचत आरएसटी स्कूलने २-१ अशी बाजी मारली. दुर्गेश मेस्त्रीने श्रेयस लांबकानेला तर शर्वरी बंडगरने प्रिया कुशवाहाला हरवून आरएसटी स्कूलला निर्णायक विजयी दोन गुण नोंदवून दिले. सुरज केम्पूनरने यश पाटीलचे आक्रमण थोपवून समता विद्यामंदिरला एकमात्र गुण मिळवून दिला. स्नेहराज यादव, ओमकार कटके, अजिंक्य वाघ यांच्या विजयी खेळामुळे अफॅक इंग्लिश स्कूल-चेंबूर संघाने दादरच्या ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूलवर ३-० अशी मात करून स्पर्धेतील तृतीय क्रमांक मिळविला. मुंबईमधील विविध विभागातील शाळांच्या सहभागाने ६ ऑगस्टपासून रंगलेल्या सुरेश आचरेकर स्मृती चषक आंतर शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील खेळाडूंना मोफत मार्गदर्शन देखील आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उपलब्ध करून देण्यात आले.