मुकुंद रांजाणे –(प्रतिनिधी : माथेरान)
गणपती उत्सव केवळ एक दिवसावर येऊन ठेपला आहे त्या अनुषंगाने माथेरान येथे गणेशोस्तव सुरक्षित शांततेत पार पाडण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती काळजी घेतली जात आहे.शांतता कमिटी ,स्थानिक सार्वजनिक गणेश मंडळे , गणपती धारक यांची याबाबत महिन्या भरापुर्वीच येथील तहसील कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये येणारा गणेशोत्सव सण साजरा करताना कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत उपस्थित गणपती धारक व सार्वजनिक गणेश मंडळे यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन गावातील सर्वच पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर ब्लिचिंग पावडर टाकून रस्ते चकाचक केले आहेत त्यामुळे गणेश भक्तांना चालणे खूपच सोयीस्कर बनले आहे. आज दि.३० रोजी माथेरानचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे , अधीक्षक दीक्षांत देशपांडे, पाणी पुरवठा विभागाच्या अपर्णा कंटे यांनी आज माथेरान येथील इंदिरा गांधी नगर येथील विक्रात युवक मंडळ व मायरा पॉईंट येथील हरिसन स्प्रिंग येथील पाण्याच्या कुंभातील गणेश विसर्जन ठिकाणी तसेच संत रोहिदास येथील बाळ गोपाळ गणेश मंडळ , व सार्वजनिक वाचनालय ,व वॉकर टँक( बालदी) या विसर्जन ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पूर्व पाहणी करून संबंधित गणेश मंडळांना सूचना केल्या व गणेश भक्तांनी केलेल्या सुयोग्य प्रकारे कामांबाबत समस्त अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले.