मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रीत करून गुंतवणूक केल्याचे फलित असल्याचा निधी व्यवस्थापक योगेश पाटील यांचा दावा
*मुंबई, ऑगस्ट २०२२ :* एलआयसी म्युच्युअल फंडाच्या लार्ज अँड मिड कॅप फंड, या गुंतवणुकीस कायम खुल्या असणाऱ्या (ओपन-एंडेड) तसेच लार्ज कॅप आणि मिड कॅप अशा दोन्ही प्रकारच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनेच्या रेग्युगर (ग्रोथ) पर्यायातील गुंतवणूकदारांनी, स्थापनेपासून (फेब्रुवारी २०१५) ते ३१ जुलै २०२२ पर्यंत, वार्षिक सरासरी १२.४९ टक्के दराने परतावा मिळविला आहे. परताव्याच्या या दराने योजनेच्या प्रथम श्रेणीच्या मानदंड निर्देशांकालाही मात दिली आहे.
एलआयसी एमएफ लार्ज अॅँड मिड कॅप फंडाच्या रेग्युगर (ग्रोथ) पर्यायांतर्गत ३१ जुलै २०२२ पर्यंत, वार्षिक चक्रवाढ परताव्याची कामगिरी ही ५ वर्षे, ३ वर्षे आणि एक वर्ष अशा वेगवेगळ्या कालावधीसाठी अनुक्रमे ११.४४ टक्के, १८.८३ टक्के, आणि ९.१६ टक्के अशी आहे.
लार्ज आणि मिड कॅप श्रेणीतील उर्वरित २६ योजनांशी तुलना केल्यास, एलआयसी एमएफ लार्ज अॅँड मिड कॅप फंडाची कामगिरी सर्वश्रेष्ठ ठरली असून, त्याने या श्रेणीच्या सरासरीपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
३१ जुलै २०२२ पर्यंत, एकूण लार्ज आणि मिड कॅप फंड श्रेणीतील एकूण मालमत्ता (एयूएम) हे १.१७ लाख कोटी रुपये होते, तर एलआयसी एमएफ लार्ज अॅँड मिड कॅप फंडाची मालमत्ता (एयूएम) १,८३१.२६ कोटी रुपये असे होते.
एलआयसी एमएफ लार्ज अॅँड मिड कॅप फंडात एकरकमी पर्यायांतर्गत किमान गुंतवणूक ही ५,००० रुपयांपासून सुरू करता येते.
जुलै २०२२ पर्यंत एलआयसी एमएफ लार्ज अॅँड मिड कॅप फंडातून गुंतवणुकीची शीर्ष पाच उद्योग क्षेत्रांमध्ये, बँका (१५.६२ टक्के), आयटी व सॉफ्टवेअर (९.६७ टक्के), रसायने व पेट्रोकेमिकल्स (८.८१ टक्के), ग्राहकोपयोगी वस्तू (८.६९ टक्के) आणि औद्योगिक उत्पादने (७.३८ टक्के) अशी होती. इतर क्षेत्रांमध्ये किराणा क्षेत्र, औषध निर्माण आणि जैवतंत्रज्ञान, वायू, वित्त आणि आतिथ्य सेवा, भांडवली बाजार आणि पेट्रोलियम उत्पादने यांचा समावेश आहे.
आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या अव्वल पाच कंपन्यांच्या समभागांमध्ये फंडातून सर्वाधिक गुंतवणूक केली गेली आहे.