देशात 5G स्पेक्ट्रमचे लिलाव नुकतेच पार पाडले. रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, अदानी यांनी या लिलावात मोठ्या प्रमाणात स्पेक्ट्रम खरेदी केला. दरम्यान, या लिलावात अपेक्षेप्रमाणेच रिलायन्स जिओ या कंपनीनं सर्वाधिक म्हणजे 88,078 कोटी रूपयांची बोली लावली.
दरम्यान, रिलायन्स जिओ देशात सर्वात स्वस्त 5G सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. खुद्द रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी दिली. मोठ्या प्रमाणात केलेल्या स्पेक्ट्रम खरेदीनंतर रिलायन्स जिओला 22 सर्कल्समध्ये उत्तम सुविधा पुरवण्यास मदत मिळणार आहे.
रिलायन्स जिओन 22 सर्कल्ससाठी 700 MHz चे स्पेक्ट्रम्स खरेदी केले आहे. याशिवाय स्पेक्ट्रम खरेदीत एअरटेलनंही चांगली बोली लावली आहे. एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी नेटवर्क यांनी मिळून एकून 62,095 कोटी रूपयांचे स्पेक्ट्रम्स खरेदी केली. या स्पेक्ट्रम लिलावातून सरकारला 1,50,173 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. दूरसंचार कंपन्या भारतात 5G सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांचे मत आहे की टेलिकॉम कंपन्या त्यांच्या अलीकडील खर्चाची भरपाई करण्यासाठी भारतात शुल्क वाढवू शकतात.
दूरसंचार विभाग (DoT) दूरसंचार कंपन्यांकडून स्पेक्ट्रम वापर शुल्क (SUC) आकारत नाही. विभागाने तीन टक्के फ्लोअर रेटही रद्द केला आहे. या बदलांमुळे, नोमुरा रिसर्चच्या संशोधकांचा असा विश्वास आहे की तिन्ही दूरसंचार कंपन्यांनी किमतीत चार टक्क्यांनी वाढ करणे अपेक्षित आहे.
रिसर्च ऑर्गनायझेशननं असंही म्हटलं आहे की जिओ युझर्सना एअरटेलच्या युझर्सपेक्षा जास्त दरवाढीचा सामना करावा लागू शकतो. नोमुरा चया संशोधकांनी त्यांच्या अहवालात असंही म्हटलं आहे की दोन्ही कंपन्या, म्हणजे Jio आणि Airtel, त्यांच्या 5Gप्लॅन प्रीमियम किंमत ऑफर करतील अशी अपेक्षा आहे.
भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे दर वाढवण्याबद्दल ऐकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कंपन्यांनी आपले टॅरिफ प्लॅन वाढवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांनी टॅरिफ वाढीचे संकेतही दिले होते. तर दुसरीकडे व्होडाफोन आयडियाचे सीईओ रविंदर टक्कर यांनी आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहिच्या महसूलाची घोषणा करताना 2022 मध्ये पुन्हा एकदा टॅरिफ वाढू शकते असे संकेत दिले होते