मुंबई NHI NEWS: श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित श्री शिवाजी मंदिर शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत १२६ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी १८ फेब्रुवारी रोजी चुरस राहील. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने ही स्पर्धा ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील ८ वयोगटात राजर्षी शाहू सभागृह, श्री शिवाजी मंदिर, तिसरा मजला, दादर-पश्चिम, मुंबई-४०० ०२८ येथे होणार आहे. प्रत्येक वयोगटातील पहिल्या दहा मुलांसाठी व पहिल्या पाच मुलींसाठी चषक दिले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर सावंत यांनी दिली.
श्री शिवाजी मंदिर बुध्दिबळ स्पर्धा जिंकण्यासाठी लोबो फेरद्यन, आरिष गांधी, यश टंडन, अहान कतौरुका, भाविनी मल्लिक आदी आंतरराष्ट्रीय गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह उदयोन्मुख खेळाडू देखील निकराच्या लढती देतील. स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा किमान ४ साखळी फेऱ्यांमध्ये १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटच्या वेळ मर्यादेत होणार आहे. उदयोन्मुख बुध्दिबळपटूना प्रोत्साहन देण्यासाठी ७ ते १४ वयोगटातील प्रत्येक विजेत्यांमधील सर्वाधिक गुणांची सरासरी असणाऱ्या एका गटविजेत्यास ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा विशेष पुरस्कार देणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण यांनी जाहीर केले आहे. स्पर्धेची नोंदणी १७ फेब्रुवारीपर्यंत खुली असून मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्या व्हॉटसअॅपवर संपर्क साधावा.
******************************