मुंबई NHI NEWS
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेमधील निर्णायक साखळी सामन्यांतून समता विद्यामंदिर-असल्फा, माणेकलाल मेहता मुंबई पब्लिक स्कूल-घाटकोपर, अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेद सावंतच्या चौफेर चढायांमुळे समता विद्यामंदिरने माणेकलाल मेहता स्कूलला ५२-२२ असे नमवून सुपर लीग साखळी अ गटात सर्वाधिक साखळी ६ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. अष्टपैलू मुनाफ शेखने शर्थीचे प्रयत्न करूनही साखळी ४ गुण घेणाऱ्या माणेकलाल स्कूलला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेमधील सुपर साखळी ब गटात ताराबाई मोडक हायस्कूलने डिसोझा हायस्कूलवर ४२-२२ असा विजय मिळविताना अष्टपैलू अनिश पोळेकर चमकला. ब गटात ताराबाई मोडक हायस्कूलने प्रथम व डिसोझा हायस्कूलने द्वितीय क्रमांक मिळविला. क्रीडा शिक्षक सुनील खोपकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. संघटन समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या प्रोत्साहनामुळे प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघामधील उत्कृष्ट खेळाडूचा गौरव होत असल्यामुळे सहभागी खेळाडूंमध्ये उत्कृष्ट खेळ करण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.
******************************