मुंबई : को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त दादर येथे पुरंदर स्टेडीयमवर सुरु झालेल्या आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धेत वैश्य सहकारी बँक, एक्सलंट को-ऑप. बँक, अपना बँक, मुंबई बँक आदी संघांनी सलामीच्या लढती जिंकल्या. वैश्य सहकारी बँकेने नेव्हल डॉक को-ऑप. बँकेच्या ३७ धावांचा पाठलाग करीत १० गडी राखून विजय मिळविला. वैश्य बँकेच्या सहज विजयासाठी महेश पात्रेने नाबाद २७ धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. स्पर्धेचे शानदार उद्घाटन युनियनचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झाले.
दुसऱ्या सामन्यात एक्सलंट को-ऑप. बँकेने शिक्षण संस्था बँकेवर एका धावेने विजय मिळविताना विकीने २१ धावांची चौफेर फटकेबाजी केली. अपना बँकेने चेंबूर सहकारी बँकेचा २४ धावांनी तर मुंबई बँकेने जीएस महानगर बँकेचा ९ विकेटने पराभव केला. उदघाटन प्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक ग्रेटर बँकेचे सीईओ थाकराणी, युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, ठाणे युनियन सरचिटणीस प्रदीप पाटील, सहकोषाध्यक्ष जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, अमोल प्रभू, राजेश कांबळे, हासम धामस्कर, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरीश ठाकुर, अशोक नवले, धर्मराज मुंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
************************