महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून सुरु झालेल्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेत माणेकलाल मेहता मुंबई पब्लिक स्कूल-घाटकोपर संघाने पश्चिम उपनगर विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला. झटापटीने रंगलेल्या संपूर्ण सामन्यामध्ये माणेकलाल स्कूलने समता विद्यामंदिरचे आव्हान ५८-५५ असे संपुष्टात आणले आणि विभागीय प्रथम स्थानावर झेप घेतली.
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित पश्चिम उपनगर विभागीय निर्णायक लढत माणेकलाल स्कूलचा सामनावीर राहुल बराई व कुलदीप सिंग विरुद्ध समता विद्यामंदिरचा हर्ष पावसकर व करण इंगवले यांच्या चौफेर चढायांनी गाजली. मध्यंतराला माणेकलाल स्कूलने २२-१८ अशी घेतलेली आघाडी अखेर समता विद्यामंदिर संघावर ३ गुणांनी विजय मिळविण्यास उपयुक्त ठरली. यावेळी शालेय कबड्डी संघांकडून प्रात्याक्षिकांसह वॉर्म-अपचा सराव करून घेतांना त्यापासून होणाऱ्या फायद्यांची माहिती देण्यात आली. वॉर्म-अप केल्यामुळे खेळतांना क्वचितच किरकोळ दुखापत होते. म्हणून मार लागण्याची भीती न बाळगण्याचा सल्ला शालेय खेळाडूंना देण्यात आला. तसेच खेळाडूंनी सामन्यात केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्यात आले.