Mumbai ) NHI
श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धेमधील मुले गटात आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल-वडाळा व मुली गटात एसआयईएस हायस्कूल-माटुंगा संघाने विजेतेपद पटकाविले. मुलांच्या अंतिम सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर प्रारंभापासून मोठी आघाडी घेत आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने गिरगावच्या मारवाडी विद्यालयाचा ५४-२८ असा सहज पराभव केला. शालेय मुलांमध्ये विवेक कदमने उत्कृष्ट चढाईचा, आदित्य गुप्ताने उत्कृष्ट पकडीचा व श्रेयस पुल्लुरीने सामनावीर पुरस्कार मिळविला.
श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती-मुंबई आयोजित शालेय कबड्डीमधील मुलींच्या अंतिम सामन्यात तनुश्री शिंदे व आशा सिंग यांच्या सुंदर खेळामुळे एसआयईएस हायस्कूलने मालाडच्या उत्कर्ष मंदिरचे आव्हान ५३-२९ असे संपुष्टात आणले. मुलींमध्ये तन्वी बरागडेने उत्कृष्ट चढाईचा, आशा सिंगने उत्कृष्ट पकडीचा व तनुश्री शिंदेने सामनावीर पुरस्कार मिळविला. श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ पांगम, कार्यवाह मधुकर प्रभू, स्पर्धा प्रमुख प्रकाश परब, समितीचे विश्वस्त डॉ. अरुण भुरे, अविनाश नाईक, अॅड. अरुण देशमुख, किरण पाटकर आदी मंडळींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.