MUMBAI NHI :
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत विभागवार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा कबड्डी प्रशिक्षणासह होणार असून नामवंत तज्ञ प्रशिक्षक व खेळाडूंचे मोफत मार्गदर्शन शालेय खेळाडूंना लाभणार आहे.
मुंबईतील विविध चार विभागातील गट विजेते शालेय संघ अंतिम टप्प्यातील चँम्पियन ऑफ चँम्पियन्स सुपर लीगसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामधील चारही संघांतील खेळाडूंना आत्माराम मोरे प्रतिष्ठान तर्फे टी-शर्ट्स तसेच आकर्षक चषक, मेडल्स, प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. अंतिम टप्पा ८ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. संपूर्ण स्पर्धेमधून शालेय ४० खेळाडूंचे ४ संघ तयार करून मुंबईत विविध ठिकाणी त्यांचे कबड्डी कसोटी सामने वार्षिक परीक्षेनंतर एप्रिलमध्ये खेळविण्यासाठी आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण प्रयत्नशील आहेत. भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय संघांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७), सुनील खोपकर (९७०२० ८०३४३) किंवा प्रॉमिस सैतवडेकर (८६५२० ५८८९८) यांच्याकडे १३ जानेवारीपर्यंत संपर्क साधावा.