कामगार झोपेत असताना अचानक लागली आग
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली.
सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणे कठीण होते, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने स्वतःची सुटका केली. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग
आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबरने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबरने सांगितले की, ”काम बंद करून आम्ही मध्यरात्री आम्ही झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली. आजूबाजूला पाहिले तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पदे कठीण झाले होते. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले.”
4 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या आगीवर तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले. सर्व मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरू केला आहे.