दिवा, ता. 25 डिसेंबर (बातमीदार) – दिवा शहरातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोकण प्रतिष्ठान या बिगर राजकीय संघटनेचा १० वर्धापनदिन सोहळा सुमित हॉल येथे काल उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमात कोकण प्रतिष्ठानकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या २०२४ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू, खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लकी ड्रॉ मध्ये विजयी ठरलेल्या ५ भाग्यवान महिलांना शिवम ज्वेलर्स तर्फे खास पैठणी भेट म्हणून देण्यात आली. लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडले. ज्याला उपस्थित कोकणवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कदम यांनी केले.
यावेळी दिवा शहरातील विविध पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कोकण प्रतिष्ठानच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच दिव्यातील विविध भजन मंडळे आणि खेड तालुका कोकण रहिवासी मंच, कोकण रहिवासी संघटना, मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक, मराठा उद्योजक लॉबी, जाणता राजा मित्र मंडळ, आम्ही सिंधुदुर्ग रहिवाशी संघ सेवाभावी संघटना, दिव्यांग वुमन राइट्स संघटना, जनविकास फाउंडेशन, कुणबी समाज संघटना दिवा, माणगाव निजामपूर संघटना, महाड तालुका रहिवासी संघटना, क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज, भराडी देवी गोविंदा पथक या विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवदत्त घाडी आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे यावेळी आभार मानले.