मुंबई/NHI:
कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक विनाशुल्क आंतर शालेय सुपर लीग कॅरमच्या पश्चिम मुंबई विभागातून पार्ले टिळक विद्यालय, समता विद्यामंदिर संघांनी निर्णायक फेरीत प्रवेश केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित विभागीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये विलेपार्लेच्या पार्ले टिळक विद्यालयाने दहिसरच्या युनिव्हर्सल हायस्कूलचा २-१ असा तर साकीनाक्याच्या समता विद्यामंदिरने सावित्रीबाई फुले हायस्कूलचा २-१ असा चुरशीचा पराभव केला.
वेदांत राणेने पार्ले टिळक विद्यामंदिरच्या अमेय जंगमचा ९-० असा पराभव करून युनिव्हर्सल हायस्कूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीत सार्थक केरकरने हर्ष सोळंकीला २५-० असा नील गेम देत पार्ले टिळक विद्यामंदिरला १-१ अशी बरोबरी करून दिली. तिसऱ्या एकेरीमध्ये विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या सामन्यात मंदार पालकरने १०-९ अशी बाजी मारली आणि पार्ले टिळक विद्यामंदिरच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केला.
दुसऱ्या लढतीमध्ये समता विद्यामंदिरच्या लोकेश पुजारीने आदर्श बैठावर ११-४ असा तर अनमोल चौहानने आयुष मिश्रावर ८-४ असा विजय मिळवून सावित्रीबाई फुले हायस्कूल संघाला २-१ असे हरविले. निहाल खत्रीने करण गायकवाडचा १३-७ असा पराभव करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते सहकार्यीत स्पर्धेमध्ये शालेय खेळाडूंच्या अटीतटीच्या खेळामुळे दर्जेदार सामने होत आहेत. पंचाची कामगिरी अविनाश महाडिक, प्रॉमिस सैतवडेकर, सुनील खोपकर, ओमकार चव्हाण, वेदांत महाडिक, यश पालकर, प्रतिक हेरेकर आदी करीत आहेत.
******************************