mumbai
दक्षिण मुंबई विभाग प्राथमिक फेरीमधून सर एली कदुरी स्कूल-माझगांव संघाने कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक विनाशुल्क आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेत प्रवेश केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित दक्षिण मुंबई विभाग निर्णायक फेरीमध्ये सर एली कदुरी स्कूलने भायखळ्याच्या अँटोनियो डिसोझा हायस्कूलचा ३-० असा पराभव करून सुपर लीग पात्रता फेरी गाठली. डिसोझा हायस्कूलला दक्षिण मुंबई विभागाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सर एली कदुरी स्कूल विरुद्ध सामन्यात डिसोझा हायस्कूलच्या मंथन घोडेकरने पहिले दोन बोर्ड जिंकून ८-० असा छान प्रारंभ केला. परंतु त्यानंतर अचूक सोंगट्या टिपणाऱ्या सार्थक मोहितेने १३-८ असा विजय मिळवीत सर एली कदुरी स्कूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात मयूर गोरेगावकरने आदित्य शेरकरला १४-२ असे तर याकुब मुल्लाने अथर्व देवकरला १२-० असे नमवून सर एली कादुरी स्कूलच्या विजयावर ३-० असा शिक्कामोर्तब केला. अफॅक इंग्लिश स्कूल-चेंबूर, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी, नारायण गुरु विद्यालय-चेंबूर, आरएसटी माध्यमिक विद्यालय-गोवंडी, सेस मायकल स्कूल, कुमुद विद्यालय इंग्लिश स्कूल आदी आठ शालेय कॅरम संघांमध्ये पूर्व मुंबई विभागातून सुपर लीगमध्ये पात्र ठरण्यासाठी ६ डिसेंबरपासून चुरशीच्या लढती होतील.