आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एलआयसी-आयडियल कप ७/८/९/१०/११/१२ वर्षाखालील मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित बुध्दिबळपटूसह १३२ खेळाडूंमध्ये चुरस होईल. ही स्पर्धा आरएमएमएस वातानुकुलीन सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार असून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी पुरस्कृत केली आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत.
एलआयसी-आयडियल कप बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी वेद शाह, फेरद्यन लोबो, नारायण शर्मा, आर्य नाईक, यश टंडन, समर्थ शशांक, डेत्यन लोबो, जीयाना धरमसी, मीरा गोगरी, नचिकेत अय्यर, समर्थ वाईरकर, वरुण कृष्ण आदी उदयोन्मुख बालबुध्दिबळपटू प्रतिस्पर्ध्यांच्या राजावर विजयी हल्ले करण्याच्या पूर्ण तयारीनिशी सिध्द आहेत. विविध ६ वयोगटामधील स्विस लीग पध्दतीची प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची आहे. प्रत्येक वयोगटांमधील पहिल्या ७ मुलांना व पहिल्या ३ मुलींना आकर्षक एलआयसी-आयडियल कपचा आणि १० एलआयसी-आयडियल मेडल्सचा पुरस्कार दिला जाणार आहे. बालदिनाच्या एलआयसी-आयडियल कप बुध्दिबळ स्पर्धेनिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत बुध्दिबळ खेळाचे विनाशुल्क मार्गदर्शन शिबीर आयोजित करून शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले.