चीनमधून फैलावलेल्या करोना संकटाचे चटके संपूर्ण जग आजही सोसत आहेत. आता कुठे करोना नावाचं संकट थांबण्याचं नाव घेत असताना चीन देश मात्र संकटाची मालिका सुरूच ठेवतंय. त्याचे परिणाम इतर देशांनाही भोगावे लागत आहेत. करोनानंतर चीनच्या आणखी एका संकटामुळे भारतीयांवर मोठी आपत्ती निर्माण होता होता राहिली. २४ जुलै रोजी चीनने अवकाशात सोडलेलं एक रॉकेट आऊट ऑफ कंट्रोल झाल्यामुळे गेल्या शनिवारी ते पृथ्वीवर कोसळणार होतं. या रॉकेटचं वजन तब्बल २३ मेट्रिक टन इतकं होतं. पण सुदैवाने हे रॉकेट लोकांचा वावर असलेल्या देशात पडले नसून ते महासागरात जाऊन कोसळले. त्यामुळे या आस्मानी संकटात जास्त नुकसान झालं नाही.
चीनच्या लाँग मार्च 5B रॉकेटचा अवशेष शनिवारी संध्याकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार होता. वातावरणाच्या घर्षणामुळे बहुतेक ढिगारा आधीच जळून जाणार होता. २५ टन वजनाचे रॉकेट २४ रोजी चीनच्या अपूर्ण टियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर वेंटियन प्रयोगशाळा केबिन मॉड्यूल वितरित करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, या रॉकेटचा अवशेष ३० जुलै रोजी संध्याकाळी ७.२४ वाजता पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल. रविवारी सकाळी याचा काही ढिगारा कोसळू शकतो, असंही चीनने सांगितलं होतं. शनिवारी चीनचे एक रॉकेट भारताच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरात कोसळले. नासाचे म्हणणे आहे की चीनने या रॉकेटशी संबंधित माहिती दिली नव्हती, ते पृथ्वीवर कुठे पडू शकते हे देखील सांगण्यात आले नव्हते.