बर्मिंगहम: बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरा दिवस भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी गाजवला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्य पदकाची कमाई झाली. या चार पदकांपैकी दोन पदकं मुलींनी जिंकली आहेत. मीराबाई चानूने सुवर्ण तर बिंद्याराणी देवीने रौप्य पदकाला गवसणी घातली. दोघींच्या कामगिरीमुळे संपूर्ण भारत आणि भारतातील मुलींना प्रेरणा मिळाली आहे.
ऑलिंपिक रौप्य पदक विजेता मीरबाई चानू एकून २०१ किलो ग्रॅम वजनाचा भार पेलवून भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०१ किलो ग्रॅम वजन उचलून तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक नवीन विक्रम नोंदवला. २७ वर्षीय चानूने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनातही नवे विक्रम प्रस्थापित केले.
मीराबाईच्या पावलावर पाऊल टाकून बिंद्याराणी देवीनेदेखील चांगली कामगिरी करून देशाचा गौरव वाढवला. महिलांच्या ५५ किलो गटात भारताच्या बिंद्याराणीने रौप्य पदक जिंकले. बिंदयाराणीने स्नॅच फेरीत ८६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११६ किलो, असे एकूण २०२ किलो ग्रॅम वजन उचलून रौप्य पदक जिंकले. नायजेरियाच्या अदिजात ओलारिनोय हिने महिलांच्या ५५ किलो गटात एकूण २०३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले.
‘वेळप्रसंगी मुली कितीही ओझे आपल्या खांद्यावर पेलवू शकतात. मग तो खेळ असो किंवा आयुष्य’, ही गोष्ट या दोघींनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे.