प्रतिनिधी/NHI
मुंबई :-आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल गुपतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड रोड सहकार्यीत कबड्डी दिनानिमित्तच्या आयडियल इंडोर शालेय पाच-पाच चढायांच्या कबड्डी स्पर्धेत रोझरी हायस्कूल, अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. आर्यन पवार व प्रयास महाडिक यांच्या अप्रतिम चढायामुळे रोझरी हायस्कूल अ संघाने वडाळ्याच्या सीताराम प्रकाश हायस्कूल संघाचा २२-६ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कबड्डी महर्षी शंकरराव साळवी यांना अभिवादन करून स्पर्धेचे शानदार उद्घाटन फादर रेव्हरंट नाईझील बॅर्रेट, सिस्टर विजया चलिल, राष्ट्रीय प्रशिक्षक व कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी, राष्ट्रीय कबड्डीपटू दिगंबर जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
डॉकयार्ड रोड येथील रोझरी हायस्कूल सभागृहामधील इंडोर कबड्डी स्पर्धेचा ताराबाई मोडक हायस्कूल-दादर विरुध्द ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा यामधील लढत विलक्षण चुरशीची झाली. पहिल्या डावात ८-५ अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानेश्वर विद्यालयाला ताराबाई मोडक हायस्कूल संघाने १४-१३ असे चकविले. मोडक हायस्कूलचा आर्यन संसारे व ज्ञानेश्वर विद्यालयाचा शिवम आव्हाड चमकले. अँटोनियो डिसोझा हायस्कूलने माझगावच्या सर एली कदुरी हायस्कूलचा ३१-६ असा सहज पराभव करतांना कौस्तुभ राजभर, मल्हार थोरात यांनी चौफेर चढाया केल्या. प्रत्येक सामन्यानंतर शालेय खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, शिक्षक राम गुडमे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिक्षक सुनील खोपकर यांनी मार्गदर्शन केले.