मुंबई/NHI/प्रतिनिधी : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल गुपतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने १५ जुलै रोजी कबड्डी दिनानिमित्त सुरु होणाऱ्या आयडियल इंडोर शालेय कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ रोझरी हायस्कूल विरुद्ध एस.पी. हायस्कूल यामधील लढतीने होईल. स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी रोझरी हायस्कूल, डिसोझा हायस्कूल, ताराबाई मोडक हायस्कूल, एस.पी. हायस्कूल, अडवाणी हायस्कूल, कादुरी हायस्कूल आदी सर्व शाळांचे खेळाडू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरत आहेत. परिणामी डॉकयार्ड रोड येथील रोझरी हायस्कूल सभागृहात मॅटवर ही स्पर्धा टायब्रेकरसाठी होणाऱ्या ५-५ चढायांमध्ये रंगतदार होईल.
रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड, अँटोनिओ डिसोझा हायस्कूल-भायखळा, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी, सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव, ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, सीताराम प्रकाश हायस्कूल-वडाळा आदी शालेय कबड्डी संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षक व नामवंत कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी, प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, शिक्षक राम गुदमे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिक्षक सुनील खोपकर आदी मान्यवर प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शालेय खेळाडूंना लाभणार आहे. प्रायोगिक स्वरूपातील इंडोर कबड्डी स्पर्धा यशस्वी झाल्यास शालेय सुपर लीग इंडोर कबड्डीचा धमाका ९ सप्टेंबरपासून आयोजित करण्यासाठी संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण प्रयत्नशील आहेत. स्पर्धेचे उद्घाटन फादर रेव्हरंट नाईझील बॅर्रेट, क्रीडा सल्लागार अश्विनीकुमार मोरे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, सिस्टर विजया चलिल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
******************************************************