मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वीच पण काल सापडला मृतदेह
पुणे : मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेले देखणे आणि चिरतरुण अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांनी वयाच्या ७७व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील ज्या फ्लॅटमध्ये ते वास्तव्यास होते त्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजार्यांनी कळवले. पोलीसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला असता काल शुक्रवारी सायंकाळी उशिरा आत रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. हा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अभिनेते रवींद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मावळ तालुक्यातील आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. सात ते आठ महिन्यांपासून ते या ठिकाणी एकटेच राहायला होते अशी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे रुग्णालयात (Talegaon Dabhade Hospital) पाठवण्यात आला आहे. रवींद्र महाजनी यांचा मुलगा व मराठी अभिनेता गश्मीर महाजनीला पोलिसांनी याबाबत कळवलं आहे. गश्मीर सध्या मुंबईला राहतो व घटनेची माहिती मिळताच तो तळेगाव येथे येण्यासाठी रवाना झाला आहे. शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल, तसेच मृत्यूचे कारणही कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रवींद्र महाजनी एक ‘हॅंडसम हिरो’
रवींद्र महाजनींची चित्रपटसृष्टीतील एक हॅंडसम हिरो अशी ओळख होती. त्यांना मराठीतील विनोद खन्नाही म्हटले जाई. महाजनी यांनी ‘हा सागरी किनारा’, ‘सुंबरान गाऊ देवा’ आणि ‘फिटे अंधाराचे जाळे’ यासह अनेक रोमँटिक गाण्यांमध्ये अभिनय केला. त्यांचा देवता हा चित्रपट रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ‘दुनिया करी सलाम’, ‘मुंबई चा फौजदार’, ‘झुंज’, ‘कळत नकळत’, ‘आराम हराम है’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘देऊळबंद’ या गश्मीर मुख्य भूमिका साकारत असलेल्या चित्रपटातही ते पाहुणे कलाकार म्हणून दिसले होते. त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.