‘आप’ने वटहुकुमाच्या मुद्द्यावर काँग्रेसला धारेवर धरल्याने चर्चेमध्ये मीठाचा खडा पडला आहे. ‘आप’ महाआघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. महाआघाडीची दुसरी बैठक काँग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यामध्ये होणार आहे. हे पाहता ‘आप’ वगळता इतर भाजपेतर प्रादेशिक पक्षांनीही काँग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी केली असल्याचे स्पष्ट झाले.
PATANA : महाआघाडी बैठकीत ‘आप’ने वटहुकुमाच्या मुद्द्यावर काँग्रेसला धारेवर धरल्याने चर्चेमध्ये मीठाचा खडा पडला. काँग्रेसने या बैठकीतच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे केजरीवाल आणि राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये तीव्र संघर्ष झाल्याचे समजते. आपापसांतील मतभेद दूर करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये कसा समन्वय साधला जातो, हे शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आप व काँग्रेसमध्ये तडजोड न झाल्याने कदाचित ‘आप’ महाआघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून भाजपविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार ही पाटण्यात शुक्रवारी तब्बल चार तास झालेल्या विरोधकांच्या बैठकीतील सकारात्मक बाब ठरली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नसला तरी, महाआघाडीसाठी एक पाऊल पुढे टाकले गेले असे म्हणता येऊ शकेल.
या बैठकीत काँग्रेसने दाखवलेली लवचिकता महत्त्वाची ठरली. आमच्या मध्ये मतभेद असतील पण, ते राष्ट्रहितासाठी बाजूला ठेवू. त्यासाठी आम्ही लवचिकता दाखवू. देशातील लोकशाहीच्या मुळावर घाव घातला जात असताना भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. विरोधकांचे ऐक्य ही प्रक्रिया असून ती पुढेही कायम राहील, असे राहुल गांधी यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाआघाडीची दुसरी बैठक काँग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यामध्ये होणार आहे. हे पाहता ‘आप’ वगळता इतर भाजपेतर प्रादेशिक पक्षांनीही काँग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी केली असल्याचे स्पष्ट झाले.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल व द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे दोघे वगळता सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. तिथे ममता बॅनर्जी यांच्यासह ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी व ‘भाकप’चे महासचिव डी. राजा यांनीही विरोधकांच्या ऐक्यावर ठाम असल्याचे सांगितले. जे इथे उपस्थित नाहीत त्यांची चिंता करण्यापेक्षा जे नेते हजर आहेत, त्यांनी केलेला एकजुटीचा निर्धार महत्त्वाचा असल्याचे नॅशनक कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांना चपराक दिली. वटुहुकमाच्या मुद्द्यापेक्षा विरोधकांच्या ऐक्याला सर्व नेत्यांनी प्राधान्य दिल्यामुळे या बैठकीनंतर केजरीवाल एकटे पडल्याचे दिसले!
पश्चिम बंगालमध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. पण, पाटण्यातील बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांचे ऐक्य झाले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढू, असे निःसंदिग्धपणे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये माकप- काँग्रेस आघाडी तृणमूल काँग्रेस विरोधात लढत असली तरी, देशाचे संविधान हा आमच्या मधील समान धागा असल्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी व काँग्रेस एकमेकांविरोधात लढले. पण, भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधक एकत्र असतील असे सपचे प्रमुख अखिलेश यादवही म्हणाले. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल वगळता सर्व विरोधी पक्षनेत्यांनी एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्धार केल्याचे दिसले. पाटण्यातील बैठक ही महाआघाडीची सुरुवात असून सिमल्यातील चर्चेमध्ये किमान समान कार्यक्रम, एकास एक उमेदवार देण्याचे सूत्र, जागावाटप आदी कळीच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेतला जाईल.