NHI/ MUMBAI
सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे सुशांत गुरव व रोहित सोमार्डे जोडीने आंतर हॉस्पिटल डबल विकेट क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक जिंकला. रोहित सोमार्डेच्या प्रभावी गोलंदाजीवर तीनदा बाद झाल्यामुळे प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर साळुंखे व रतिन मोरे जोडीला ११ धावांचे विजयी लक्ष्य कठीण झाले. परिणामी सुशांत-रोहित जोडीने ७ धावांनी विजय मिळवीत अजिंक्यपदाला गवसणी घातली. लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे फायनान्स डायरेक्टर सतीश श्रॉफ व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे शिवाजी पार्क मैदानामध्ये झालेल्या उपांत्य फेरीत सुशांत-रोहित जोडीने जे.जे. हॉस्पिटलच्या सुभाष शिवगण व नरेश शिवतरकर जोडीला अवघ्या एका धावेने चकविले. प्रतिस्पर्ध्यांच्या १३ धावांचा पाठलाग करताना सुभाष-नरेश जोडीने पहिल्या षटकात दमदार फलंदाजी केली. परंतु रोहित सोमार्डेच्या गोलंदाजीवर एकदा बाद झाल्यामुळे सुभाष-नरेश जोडीला १२-१३ अशा धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या ज्ञानेश्वर साळुंखे व रतिन मोरे जोडीने सुरज जाधव व अफझल शेख जोडीवर १०-८ अशा धावांनी विजय मिळविला. अफझल शेखने तीन चौकार ठोकून विजयाचे संकेत दिल्यानंतर पुढील चेंडूवर तीनदा बाद झाला. त्यामुळे त्यांची अंतिम फेरीमधील प्रवेशाची संधी हुकली.