(महेश पावसकर)
मुंबई, : एका ठराविक वयानंतर साप आपली कात टाकून नवीन त्वचा धारण करतो, त्यानंतर तो अधिक चपळ होतो.. आरे कॉलनी नजीक असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी देखील शासनाने अलीकडेच मंजूर केलेला 100 कोटींचा निधी वापरून कात टाकायला तयार झालेली आहे. चित्रपट उद्योगा करिता एक नवीन अत्याधुनिक चित्रनगरी लवकरच निर्माण होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
सुमारे 521 एकर वर उभी राहिलेली ही चित्रनगरी शासकीय उदासीनतेमुळे गेली 25 वर्षे अत्यंत मनोवेधक निसर्ग संपन्नता लाभून देखील हवी तशी प्रगती साधू शकली नाही हे वास्तव आहे..
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे चित्रनगरी चे वास्तव जाणुन घेण्यासाठी अलीकडेच अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत दादासाहेब फाळके चित्रनगरी चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी चित्रनगरी च्या विकासाचे संकल्पचित्र सादर केले.
मुंबई सारख्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व विविध चित्रपट, मालिका आणि जाहिरात पटांसाठी चित्रनगरी नव्याने देत असलेल्या आधुनिक सुविधांची माहिती त्यांनी दिली.सरकारी आणि खासगी सहभागाने
(पीपिपी तत्वावर) फिल्मसिटी ला अत्याधुनिक रूप देउन अधिकाधिक चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करुन भारतीय चित्रपट व्यवसायाला भरभराट आणावी हा मुख्य उद्देश असल्याचे संचालक अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
फिल्मसिटी च्या 521 एकर पैकी फक्त अर्ध्या भागात म्हणजे 250 एकर चित्रीकरणासठी ऊपलब्ध करुन दिले गेले आहे.33 एकर जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ला दिली असून सुमारे 10 एकर जागा अतिक्रमणाने व्यापलेली आहे.
2019 मध्ये फिल्मसिटी चा कायापालट करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, मात्र अतिक्रमण केलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहीला ज्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
सध्या या फिल्मसिटी मध्ये एकूण सोळा छोटे – मोठे वातानुकूलित स्टुडिओ असून त्यात बिग बॉस, कपिल शर्मा शो, तारक मेहता का उलटा चष्मा ,कौन बनेगा करोडपती या सारख्या प्रसिद्ध मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. यातील एक , दोन स्टुडिओ खूप जुने आणि मोडकळीस आले असून ते पाडून टाकण्याशिवाय पर्याय नाही असे या संचालक ढाकणे यांनी सांगितले . आम्ही अत्यंत परिपूर्ण असा पुनर्विकास आराखडा तयार करीत असून तो खासगी -सरकारी भागीदारी (पिपीपी) तत्त्वावर आधारित लागू करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्टुडिओ आणि खुल्या जागांच्या आरक्षणासाठी प्रत्यक्ष येऊन ऑफलाईन आरक्षण करण्याची पद्धत रद्द करून सर्व बाबी आँनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत, त्यात कोणत्या जागा कधीपर्यंत आरक्षित आहेत याचीही माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले. याशिवाय फिल्मसिटी मध्ये चित्रीकरणासाठी अद्ययावत रेल्वे स्टेशन आणि ट्रॅक बनवायला सुरुवात करीत आहोत , आँनलाईन पोर्टल तयार करून त्याद्वारे सर्व प्रकारच्या कथा , संकल्पना निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचेही ढाकणे यांनी सांगितले.
सध्या फिल्मसिटी मधील पर्यटकांसाठी आकर्षण बनून राहीलेल्या बॉलीवूड थीम पार्क चे प्रत्यक्ष अवलोकन पत्रकारांनी केले.
शासकीय काम आणि महिनोन महिने थांब, या वास्तवाला फाटा देउन महाराष्ट्र सरकारच्या या 521 एकर जागेचा सुयोग्य उपयोग करुन चित्रपट सृष्टीला भरभराट आणण्याचे कार्य आगामी काळात घडले तरच ती दादासाहेब फाळके यांच्यासारख्या भारतीय चित्रपट सृष्टी ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या द्रष्ट्या महान निर्मात्याला आदरांजली राहील…